पुणे महानगरपालिका क्षेत्रात ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिकच्या पाण्याचा वापर होत असल्याचा आरोप सातत्याने होत होता. अशा परिस्थितीत गेल्या आठवड्यात पुणे महानगरपालिकेत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान त्यांनी महापालिकेकडून मंजूर कोट्यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी वापरण्यात येत असल्याची टीका केली. पुणे शहरातील पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत योग्य उपाययोजना केली जाण्याची गरज निर्माण झालेली आहे.
जल व्यवस्थापनासाठी मीटर बसवणार!
महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे लक्षात आले असून, ही गळती थांबवण्याच्या सूचना अलीकडेच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या होत्या. यानंतर महापालिकेने जागरूक होत पाणीगळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘समान पाणीपुरवठा योजने’अंतर्गत प्रत्येक नळजोडणीवर एमएमआर मीटर अनिवार्यपणे बसविण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. या मीटर बसवण्याला कोणीही नागरिक किंवा राजकीय नेत्यांनी विरोध केल्यास, अशा व्यक्तींविरोधात थेट गुन्हा नोंदवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिकेने शुक्रवारी आदेश काढत सर्व घरांमध्ये मीटर बसवणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी प्रत्येक नळजोडीवर AMR (ऑटोमॅटिक मीटर रीडिंग) मीटर लावणे आवश्यक आहे. आतापर्यंत या कामाला वेग मिळाला असून, पुढील एका महिन्यात पुणे शहरातील उर्वरित शंभर टक्के मीटर बसवण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.सध्या रहिवाशांकडून दरवर्षी 900 रुपये मिळकतकरात पाणीपट्टी आकारली जाते. मात्र मीटर बसल्यानंतर पाण्याचे बिल वापरावर आधारित असेल. एक हजार लिटर पाण्यासाठी 8 रुपये आकारले जातील.
पाण्याच्या व्यवस्थापनासाठी मोठे पाऊल!
प्रत्यक्षात महापालिकेचा प्रति किलो लिटर पाणी शुद्धीकरण व वितरणाचा खर्च 25 रुपये आहे. त्यामुळे पाण्याचा काटेकोर वापर करून भविष्यातील वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे, महापालिकेचे अधिकारी मीटर बसवण्यासाठी घरी आले असता नागरिकांनी सहकार्य करावे. विरोध केल्यास संबंधित नळजोड बंद केली जाईल किंवा IPC कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील 2 लाख 63 हजार नळजोडांपैकी सुमारे 1 लाख 85 हजारांवर मीटर बसवण्यात आले आहेत. उर्वरित 77 हजार मीटरसाठी काम प्रगतीपथावर असून, एकूण पाच ठेकेदारांकडे हे काम सोपवले गेले आहे. प्रत्येकाने महिन्याभरात किमान 15 हजार मीटर बसवावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.कोथरूड, धनकवडी, कात्रज, मध्यवर्ती पेठा, कसबा पेठ, ससाणेनगर, येरवडा, कोंढवा, महंमदवाडी आणि मार्केट यार्ड या भागांमध्ये मीटर बसवण्यास विरोध होत आहे. अजूनही पुण्यात सुमारे 40 टक्के पाणी वाया जाते. ही गळती तात्काळ रोखली नाही, तर भविष्यात पाण्याचा तुटवडा भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती पुणे मनपाचे पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.





