छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांची सततच्या पाणीपुरवठा बंदमुळे चांगलीच तारांबळ होताना दिसत आहे. नागरिकांना चांगलाच मनस्ताप होत आहे. महापालिका आणि पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात शहरातील नागरिकांमध्ये सध्या तीव्र असंतोष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आणखी किती दिवस शट-डाऊन राहणार ?
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी मिळण्यासाठी नागरिकांना आधीच 6 ते 7 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. आता नवीन 2500 मिमी जलवाहिनीची जोडणी संथ गतीने होत असल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. सहा दिवसांचे घोषित शटडाऊन पूर्ण झाले असले तरी काम मोठ्या प्रमाणात बाकी असल्याने ते आणखी दोन दिवस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात येणाऱ्या या मुख्य जलवाहिनीतील 130 मीटर गॅपपैकी सध्या फक्त 35 मीटरची जोडणी पूर्ण झाली आहे. उर्वरित 95 मीटरचे काम टाकळी परिसरात सुरू असून ते तांत्रिकदृष्ट्या अत्यंत किचकट असल्याचे समजते. त्यामुळे जुन्या 900 मिमी पाईपलाईनवर देण्यात आलेला शटडाऊन अपेक्षेपेक्षा जास्त लांबला आहे.





