मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शहराच्या काही भागातील लोकांना सोमवारी आणि मंगळवारी पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने पाइपलाइन क्रॉस-कनेक्शनचे काम हाती घेतले आहे, त्यामुळे तब्बल 30 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईतील तब्बल 11 विभागांमधील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. काही ठिकाणी पाणीकपात होणार आहे तर काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची डोकेदुखी आता चांगलीच वाढणार आहे. एकूणच अशा पाणीकपातीमुळे किंवा पाणीपुरवठा बंद राहिल्याने मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य पूर्णपणे कोलमडत असते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे.
30 तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर (पूर्व) येथील छेडानगर जंक्शन परिसरामधील 3000 मिमी मुख्य जलवाहिनीला अमर महल बोगदा शाफ्टशी जोडण्याचे काम केले जाणार आहे. हे काम 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होऊन मंगळवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत केले जाणार आहे. यामुळे शहरातील काही भागात 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर कमी दाबाबने पाणी पुरवठा होणार आहे.

पाइपलाइन क्रॉस-कनेक्शनच्या कामामुळे दक्षिण आणि मध्य मुंबईतील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर वॉर्ड तसेच पूर्व उपनगरांतील एल, एम पूर्व, एम पश्चिम, एस आणि एन वॉर्ड या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. याचाच अर्थ भायखळा, मुंबई सेंट्रल, नागपाडा, डोंगरी, मस्जिद बंदर, वरळी, परळ, सायन, वडाळा आणि शिवडी या भागातील पाणी पुरवठा 30 तासांसाठी बंद राहणार आहे. तसेच पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूर, चूनाभट्टी, गोवंडी, देवनार, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप या भागातील काही परिसारातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, किंवा कमी दाबावे पाणीपुरवठा होणार आहे.
मुंबईकरांनो, पाणी साठवा; पाणी जपून वापरा
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 4 ते 5 दिवस पाणी उकळून – गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांना पाणी साठविण्याबरोबर आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे काही दिवस नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.











