शहरातील सतत सुरू असलेल्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनियमित पाणी येणे, कमी दाबाने पुरवठा होणे किंवा पूर्णपणे पुरवठा बंद राहणे यामुळे दैनंदिन कामात अडथळे निर्माण होत आहेत. पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतेपर्यंत सर्वच गोष्टींवर परिणाम होत आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने त्रास आणि खर्च वाढतो आहे. अशा परिस्थितीती आता अचानक आता मुंबई आणि ठाणेकरांची डोकेदुखी वाढविणारी अशी एक बातमी समोर आली आहे. कारण, पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत होणार आहे.
मुंबई, ठाणे, डोंबिवलीत पाणीपुरवठा विस्कळीत
ठाणे आणि मुंबई परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत 24 तासांसाठी 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे, तर ठाणे शहरात 3 दिवसांसाठी 30 टक्के कपात जाहीर करण्यात आली आहे. डोंबिवलीकरांना देखील 15 तासांच्या पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने पाणीपुरवठा यंत्रणेच्या अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ठाणे आणि मुंबई परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मु्ंबईसह ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना पाणीकपातीची सामना करावा लागणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी 9 डिसेंबर रोजी महत्त्वाच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी 15 तासांचा शटडाऊन जाहीर केला आहे. यामुळे डोंबिवलीच्या पूर्व आणि पश्चिम भागातील पाणीपुरवठा सकाळी 9 ते रात्री 12 या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आणि आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन महानगर पालिकेकडून करण्यात आले आहेत.
मोहिली उदंचन केंद्रातून नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात 150 एमएलडी क्षमतेने पाणी शुद्ध केले जाते. येथे फिल्टर बेड आउटलेट पाइपलाइन बदलण्याचे काम तातडीने करण्यात येत आहे. तसेच ‘अमृत–2’ योजनेअंतर्गत खंबाळपाडा येथील नवीन ओव्हरहेड पाण्याच्या टाकीला मुख्य जलवाहिनीशी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. डोंबिवलीच्या वितरण व्यवस्थेतील देखभाल आणि दुरुस्तीची इतर कामेही त्याचवेळी केली जाणार असल्याने संपूर्ण यंत्रणा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख जलवाहिनीचे महत्त्वाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी 8 डिसेंबरपासून संपूर्ण शहरात 24 तासांसाठी 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या पाणीकपातीचा परिणाम कुलाबा ते दादर, माहीम, वांद्रे, अंधेरी, मालाड ते दहिसर आणि कुर्ला ते भांडुप या भागांवर होणार आहे. पाणीकपातीचा मोठा व्याप पाहता मुंबईतील रहिवाशांनाही पाण्याचा योग्य साठा ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे शहरातील जलपुरवठ्यावरही मोठा ताण निर्माण झाला आहे. पिसे बंधाऱ्याहून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी नेणारी 1000 एमएम डायमीटर जलवाहिनी 6 डिसेंबर रोजी कल्याण फाटा येथे महानगर गॅसच्या कामादरम्यान नुकसानीसह नादुरुस्त झाली. त्यामुळे पुढील 3 दिवस 30 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे पालिकांचे आवाहन
महापालिकेने स्पष्ट केले आहे की शटडाऊन कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार असल्याने नागरिकांनी अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी पूर्वसाठा करून ठेवणे अत्यावश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच आवश्यक गरजांसाठी पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा समतोल राखण्यासाठी 8 डिसेंबरपर्यंत झोनिंग पद्धतीने शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. काही भागांमध्ये संपूर्ण दिवसभर कमी दाबाचा तर काही भागांमध्ये काही वेळ पाणीपुरवठा बंद ठेवून वितरण व्यवस्थेचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.











