Sharad Pawar -राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा हे विधेयक मंजूर केले. हा कायदा मंजूर झाल्यानंतर याला मोठ्या प्रमाणात सामाजिक व राजकीय क्षेत्रातून विरोध होत आहे. मात्र हा कायदा देशद्रोही आणि देशाविरोधात कारवांया करणाऱ्या विरोधात वापरला जाईल. असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, आज (गुरुवारी) या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडी तसेच अन्य घटक पक्षाकडून घटनाविरोधी, जनविरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करा, या मागणीसाठी भव्य राज्यव्यापी परिषद, निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. यात या कायद्यावरुन शरद पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लोबल केला.
लोकशाहीचा मूलभूत अधिकार मिळत नाहीत…
आजच्या निर्धार परिषदेला आज लोकांचा चांगला पाठिंबा आहे. आजची देशातील परिस्थिती पहिल्यानंतर ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. भाजपाच्या प्रवक्ते राहिलेल्यांना आज न्यायदानाचा अधिकार कसा काय दिला जातो? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित करत केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टिका केली. सत्तेचा दुरुपयोग आणि लोकशाहीचा मूलभूत अधिकार लोकांना मिळत नाहीत. जनसुरक्षा कायद्यामुळे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे.
दरम्यान, या कायद्याविरोधाग आपण सगळे पेटून उठलो पाहिजे, ती ताकद आपल्यामध्ये आहे. ती पुढेही दिसून येईल, असं शरद पवार म्हणाले. आज न्याय व्यवस्थेवर हल्ला होत आहे. जो कोणी अन्यायाविरोधात विचारतो, त्याच्यावर हल्ला केला जात आहे.
प्रत्येक हल्ल्याला आपण प्रतिकार करु…
दरम्यान, लोकशाही गळचेपी करणाऱ्या या काळ्या कायद्याविरोधात ठाम भूमिका घेण्यासाठी तसेच संविधानावर, लोकशाहीवर आणि नागरिकांच्या अधिकारांवर घाला घालणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला आपण प्रतिकार करू. यासाठी आजचा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सुरुवातीला सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सांगितले. तर शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस तसेच मया मेळाव्यात जनसुरक्षा कायद्यावरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, शेकाप, भाकप, माकप तसेच आदी पक्षातील नेते उपस्थित होते.





