काही दिवसांपासून राज्यात झपाट्याने वातावरण बदलले असून याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले तर आता राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. यातच भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट असणार असणार असल्याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात थंडीची लाट येणार !
राज्यात तापमानात सातत्याने घट होत असून थंडीचा प्रभाव वाढत चालला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत आधीच कमी तापमानाची नोंद झाली होती, आणि आता तिथे थंडी आणखी वाढत आहे. 12 नोव्हेंबरला राज्यभर आकाश प्रामुख्याने निरभ्र राहणार असून तापमानात घट जाणवेल. दिवसा उन्हाचा तडाखा तर सकाळी आणि रात्री गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
मुंबईत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे 21 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. पुण्यात आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके राहू शकते. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरातही कोरडे हवामान राहील. या भागात तापमानात सातत्याने घसरण होत आहे.
मराठवाडा-विदर्भ गारठणार ?
जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही कोरडे वातावरण राहून तापमानात घट होईल, असा अंदाज आहे. नागपूरसह अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र राहील. नागपूरमध्ये कमाल तापमान 28 अंश तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये आकाश स्वच्छ राहील. कमाल तापमान 31 अंश आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके राहू शकते. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर येथेही थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
तापमान 12 अंशावर घसरणार ?
तर 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी राज्यातील काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता असून किमान तापमानाच्या पाऱ्यात 4 ते 5 अंशांची घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुढील काही दिवस थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांतील तापमान 12 अंशांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Cold Wave Warning !
Cold wave conditions are very likely over isolated pockets of Madhya Pradesh, south Haryana, Chhattisgarh, and northeast Rajasthan during 11th – 15th November.
Stay warm ❄️, stay safe, and take necessary precautions !#ColdWaveWarning #StayWarm… pic.twitter.com/Cv8xIQtCQr
— India Meteorological Department (@Indiametdept) November 11, 2025






