राज्यातील वातावरण पुन्हा एकदा बदलत्या वाऱ्यांच्या आणि ढगांच्या हालचालीमुळे अस्थिर झाले आहे. परतीचा प्रवास सुरू असतानाच कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे परतीचा पाऊस काही ठिकाणी चांगली हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील कामे आवरून घ्यावी लागणार आहे, तसेच काढणीला आलेल्या पिकांचे नियोजन करावे लागणार आहे.
काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
पुढील काही दिवस अनेक भागात पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात 8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत 8 ऑक्टोबरला, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत 8 व 9 ऑक्टोबरला वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. असे सांगण्यात आले आहे. मराठवाड्यात पुढील चार-पाच दिवसांत कमाल तापमानात वाढ होईल असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील 48 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस होऊ शकतो. असा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, पुणे, बीड, परभणी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींचा अंदाज आहे.
राज्यातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू
पश्चिम-मध्य अरबी समुद्रातील ‘शक्ती’ चक्रीवादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरित झाले असून त्याची तीव्रता हळूहळू ओसरत आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील विविध भागात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू झाला असून पुढील काही दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही भागांतून मान्सून माघार घेणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस मान्सून गुजरात आणि उत्तर भारतातून मागे सरकला होता. त्यामुळे लवकरच यंदाचा पाऊस निरोप घेणार आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/98O2cQkliC
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 7, 2025











