मुंबईत आज युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला. यानिमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकत्र पाहायला मिळले. या सोहळ्याला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थितीत राहिले होते. हा सोहळा प्रभादेवीतील इंडिया बुल्स बिल्डिंग येथे, तनिष्काच्या निवासस्थानी पार पडला. या खास प्रसंगी पवार कुटुंबातील अनेक नेते आणि सदस्य उपस्थित होते, ज्यामुळे राजकीय कुटुंबातील एकात्मतेचा भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. या आनंदाच्या प्रसंगात पवार कुटुंबीय अगदी उत्साहाने उपस्थित राहिले होते.
सोहळ्याला पवार कुटुंबीय एका मंचावर
हा समारंभ नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या एका भव्य कौटुंबिक सोहळ्यानंतर झाला . अजित पवासोहर यांचे पुत्र जय पवार यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठ्या थाटात साजरा झाला होता. सलग दोन साखरपुडे झाल्याने पवार कुटुंबात सध्या आनंदाचे आणि एकतेचे वातावरण आहे. या समारंभाचे विशेष महत्त्व आहे, कारण युगेंद्र पवार यांनी यापूर्वी अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती, ज्यामुळे पवार कुटुंबातील पिढीगत विचारसरणीतील फरक अधोरेखित झाला होता. मात्र, आजचा सोहळा हे अधोरेखित करतो की राजकीय विचार वेगळे असले तरी कुटुंबाचे बंध दृढ आहेत.
तनिष्का कुलकर्णी नेमकी कोण?
तनिष्का कुलकर्णी ह्या मूळच्या मुंबईतील असून त्यांचे वडिल नामवंत उद्योगपती आहेत. मुंबईतील प्रभादेवी परिसरातील ते रहिवाशी आहेत. तनिष्का यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले असून उच्च शिक्षणासाठी त्यांनी विदेश गाठले होते. लंडनमधील कास बिझनेस स्कुलमध्ये त्यांनी फायनान्स क्षेत्रात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तनिष्का यांच्याबाबतीत सध्यातरी अधिकची माहिती सार्वजनिक नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत युगेंद्र आणि तनिष्का यांच्या नात्याची माहिती दिली होती. माझा भाचा युगेंद्रचा तनिष्कासोबत साखरपुडा झाला आहे. दोघांनी आयुष्यभर आनंदी आणि एकत्र रहावं, खूप शुभेच्छा. पवार कुटुंबामध्ये तनिष्काचे स्वागत करताना आनंद होत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे लागोपाठ पवार कुटुंबात कौटुंबिक कार्यक्रम साजरे झाल्याने एकोपा पाहायला मिळत आहे.





