ऐतिहासिक वाढीनंतर मौल्यवान धातू सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये दिवाळीनंतर मोठी घसरण झाली आहे. या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये दररोज घट होत आहे. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे २,००० रुपयांनी कमी होऊन १० ग्रॅमला ₹ १,२१,५१८ झाला. तर चांदीच्या किंमतीतही ४,००० रुपयांहून अधिक घट होऊन ती प्रतिकिलो ₹१.४७ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे अचानक दरात झालेली ही घसरण लक्षवेधी अशा स्वरूपाची आहे, खरंतर दरात घसरण होण्याची नेमकी कारणे काय आहेत? भविष्यातील दराची काय स्थिती असेल, याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
सोने-चांदीच्या दरात घसरणीची कारणे काय?
अलीकडच्या काही दिवसांत मौल्यवान धातूच्या म्हणजेच सोन्याच्या किंमतीत त्याच्या विक्रमी उच्चांकापासून ९,००० रुपयांहून अधिक घट झाली आहे, तर चांदीच्या किंमतीत २३,००० रुपयांची घसरण झाली आहे. १७ ऑक्टोबर रोजी या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. त्या वेळी १० ग्रॅम सोन्यासाठी लोकांना ₹१.३२ लाख मोजावे लागत होते, तर १ किलो चांदीसाठी ₹१.७० लाख आकारले जात होते.
मात्र, त्यानंतर या धातूंच्या किंमतींमध्ये मोठी घसरण होऊन त्या विक्रमी नीचांकावर पोहोचल्या आहेत. १० ग्रॅम सोन्याचा दर ₹१,२३,२५५ इतका नोंदवला गेला, तर १ किलो चांदीची किंमत ₹१,४७,१५० इतकी होती. या मोठ्या घसरणीमुळे आता लोकांमध्ये सोन्या-चांदीच्या किंमती आणखी खाली जाणार का, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते दोन्ही धातूंच्या किंमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा-वसुली सुरू केली. याशिवाय, अमेरिका-चीन व्यापारयुद्धातील तणाव कमी होणे आणि जागतिक भूराजकीय अस्थिरता कमी होणे हे देखील सोन्या-चांदीच्या दरात घट येण्याची महत्त्वाची कारणे आहेत. तसेच, धनत्रयोदशी आणि दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारात मागणीत झालेली घट ही देखील दर घसरण्याची एक मोठी कारणे मानली जात आहेत.
भविष्यातील सोने आणि चांदीच्या दराचा अंदाज
हे गुपित नाही की सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंना केवळ गुंतवणूकदारांसाठीच नव्हे तर देशांसाठीही सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखले जाते. याच कारणामुळे जगभरातील केंद्रीय बँका सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. भारतात सोनं हे फक्त दागिन्यांच्या रूपात नाही, तर भविष्यासाठीची बचत किंवा आकस्मिक परिस्थितीत उपयोगी ठरणारी मालमत्ता म्हणून लोक सोनं खरेदी करतात. तज्ज्ञांच्या मते सोनं आणि चांदी या दोन्ही धातू दीर्घकालीन सुरक्षितता देतात.
सध्या या दोन्ही धातूंच्या किंमती नफा-वसुलीमुळे घसरल्या आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की गुंतवणूकदारांनी थोडा काळ थांबून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. सोने अथवा चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आणखी काही काळ थांबणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते, जर आपण किरकोळ गुंतवणूकदार असाल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करीत असाल, तर थोड्या थोड्या प्रमाणात सोनं खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.
काही सराफा व्यावसायिक तसेच गुंतवणुकदरांचे मत विचारात घेतले असता, त्यांच्या मते सोने असो वा चांदी दोन्ही धातूंचे दर आगामी काही दिवसांत साधारणपणे १ लाखाच्या घरात स्थिरावतील, असा देखील अंदाज आता व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीसाठी तुम्ही आणखी काही काळ वाट पाहिली, तर त्याच्या तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे.