वॉशिंग्टन डीसी – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदा परदेशी वस्तूंवर टेरिफ लावण्याची घोषणा केलीय. याचा परिणाम अमेरिकेच्या शेअर बाजारावर झाला आहे.
डाऊ जोन्स, एस अँड पी आणि नॅसडॅक सारख्या मार्केट इंडेक्समध्ये 2 दिवसांत 10 टक्केपेक्षा जास्त पडझड झाली आहे. बाजारातील परिस्थिती बिघडत असल्यानं ट्रम्प सरकारनं टेरिफ वाढ 90 दिवसांसाठी लांबवली होती. आता ट्र्म्प यांनी पुन्हा एकदा 9 ऑगस्टपासून जगातील देशांवर टेरिफ आकारण्याची घोषणा केली आहे. याचा अमेरिकेच्या शेअर बाजारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या घडामोडीच्या परिणाम जागतिक मंदीत होण्याची भीतीही वर्तवण्यात येतेय.
प्रत्येक अमेरिकन नागरिकाला 2 लाख जादा खर्च करावे लागतील
अमेरिकेच्या येल युनिव्हर्सिटीच्या अनुमानानुसार, अमेरिकेत सरासरी टेरिफ रेट 18.3 टक्क्यांपर्यंत पोहचलाय. यापूर्वी 1909 मध्ये अमेरिकेतील सरासरी कर हा 21 टक्के होता. याचा अर्थ गेल्या 100 वर्षांतील ट्रम्प यांच्या कार्यकाळातील हा सर्वाधिक कर आहे.
या वाढलेल्या टेरिफमुळे अमेरिकेतील कुटुंबांना प्रत्येक वर्षी सरासरी 2400 डॉलर्स म्हणजेच दोन लाख रुपये जादा मोजावे लागणार आहेत. ज्या परदेशी वस्तू यापूर्वी ते 100 डॉलर्सना खरेदी करत होते, त्यासाठी आता त्यांना 118.3 डॉलर्स द्यावे लागणार आहेत.
ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाचा फटका अमेरिकेलाही बसणार असून अमेरिकेतील वस्तू भविष्यात महागण्याची शक्यता आहे. यात स्टील, अॅल्युमिनियन यांचा वापर होत असलेल्या वस्तूंचा समावेश आहे.
अमेरिकेच्या जीडीपीचंही होणार नुकसान
या सगळ्या धोरणामुळे अमेरिकेच्या सकल राष्ट्रीय उत्पादनालाही फटका बसणार आहे. अमेरिकेचा जीडीपी 0.5 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ अमेरिकेच्या 28 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेला सुमारे 140 बिलियन डॉलर्सचं नुकसान होण्याची शक्यता आहे. भारतीय रुपयांत ही आकडेवारी 11.6 लाख कोटी रुपये इतकी आहे.
टेरिफमुळे अमेरिकेतील खाण्यापिण्याच्या वस्तू भविष्यात महागण्याची शक्यता आहे. मासे, बीयर आणि दारुच्या किमती भविष्यात महागण्याची शक्यता आहे. टेरिप वाढीमुळे अर्थव्यवस्था मजबुतीचा दावा ट्रम्प करत असले तरी यामुळे महागाई वाढेल असा दावा आर्थिक तज्ज्ञ करतायेत.
प्रत्युत्तराच्या टेरिफमुळे ट्रेड वॉरची शक्यता
अमेरिकेनं एखाद्या देशावर जादा आयात कर आकारला तर त्या बदल्यात दुसरे देशही अमेरिकेवर जादा आयात कर आकरण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिका आणि इतर देशांत ट्रेड वॉर सुरु होऊ शकतं. सध्या तरी इतर देश हा मार्ग स्वीकारत नसले तरी दबाव टाकण्यासाठी हा मार्ग स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. असं झाल्याच अमेरिकेतील वस्तू महागण्याची शक्यता अधिक आहे.





