नवी दिल्ली- भारतावर 25 टक्के आयात शुल्क म्हणजेच टेरिफ आकारण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्था या मृत असल्याचं वक्तव्य केलंय. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना धरुन बुडाल्या तर त्यात माझं काय जाणार, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
बुधवारी ट्रम्प यांनी भारतात 1 ऑगस्टपासून 25 टक्के टेरिफ आकारण्याची घोषणा केली होती. सध्या अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर सुमारे 10 टक्के टेरिफ आकारण्यात येतो. टेरिफ वाढल्यामुळे अमेरिकेच्या बाजारात भारतीय वस्तू महागण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडिया पोस्ट काय?
भारत-रशियासोबत काय व्यवहार करते याची मला पर्वा नाही. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेत मृतवत अवस्थेत असून त्या एकत्र बुडाल्या तर मला काय त्याचं. भारतासोबत अमेरिकिचा खूप कमी व्यापार आहे. मात्र त्यांच्याकडून आकारण्यात येणारा टेरिफ जगात सर्वात जास्त आहे. तसंच रशिया आणि अमेरिकेत कोणताही व्यापार नाही आहे. हे असचं राहीलं पाहिजे.
डेड इकॉनॉमी म्हणजे काय
एखाद्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प पडली किंवा सुस्त झाली असेल तर त्याला डेड इकॉनॉमी म्हणून संबोधलं जातं. ज्यात व्यापार, उत्पादन, नोकऱ्या आणि नागरिकांच्या उत्पन्नातील वाढ जवळपास थांबून जातं. देशाचा विकास थांबतो आणि नागरिक आर्थिक अडचणीत सापडतात.
ही काही अधिकृत आर्थिक व्यवस्था नाही. मात्र याचा उल्लेख जगाच्या राजकारणात करण्यात येतो. जीडीपी, महागाई, बेरोजगारी आणि व्यापारातील तोट्यावरुन याचा अंदाज बांधण्यात येतो.
भारत-रशिया व्यापारावर ट्रम्प नाराज, त्यामुळे 25 टक्के टेरिफ
30 जुलैपासून भारतावर 25 टक्के टेरिफ आकारण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. रशियाची व्यापार सुरुच ठेवल्यास अधिकचा दंड लावण्यात येणार असल्याचीही घोषणाही त्यांनी केलीय. किती दंड आकारण्यात येईल, याची घोषणा केली नसली तरी नवा टेरिफ दर आणि दंड 1 ऑगस्टपासून लागू होईल असं ट्रम्प म्हणालेत.
काँग्रेसची मोदी सरकारवर टीका
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सत्य स्थिती सांगितली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. अदानींना मदत करण्यासाठी भाजपानं अर्थव्यवस्था बरबाद केल्याचा आरोपही राहुल यांनी केला आहे. ट्रम्प खरं सांगतायेत, मोदी आणि अर्थमंत्री सोडल्यास सगळ्यांना अर्थव्यवस्था डेड असल्याचं माहिती आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय.
तर खासदार प्रियंका गांधी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान ज्याही देशात जातात त्या ठिकाणी ते नवे मित्र करतात. त्या बदल्यात देशाला जादा टेरिफ मिळतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
केंद्र सरकारची यावर काय प्रतिक्रिया?
वाणिज्य मंत्रालयानं ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यापाराबाबत केलेल्या वक्तव्याची दखल घेतली आहे. याचा काय परिणाम होईल याचा अभ्यास करण्यात येतो आहे. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश दोघांसाठीही फायदेशीर ठरेल अशा व्यापार करारावर काम करत आहेत. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी आम्ही एकत्र आहोत.





