करुर – दाक्षिणात्य अभिनेता, राजकीय नेता विजयच्या करुरमधील रोड शोमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 10 मुलांसह 40 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. 51 जणांवर आयसीयूत उपचार सुरु आहेत, मृतांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे. आता हा अपघात नेमका कशामुळे झाला याची कारणं शोधण्यात येत आहेत.
अभिनेते आणि राजकीय नेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या रोड शोमध्ये अशी चेंगराचेंगरी झाली. जमलेल्या प्रचंड गर्दीत एक महिला मुलीला शोधत होती, धावपळ झाली आणि चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. गर्दीत खाली पडलेल्यांना तुडवून गर्दी पुढे सरकली. या दुर्घटनेत 10 लहान मुलं, 16 महिलांसह 40 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत अनेक जणं जखमी झाले असून, त्यातील 51 जणांवर आयसीयूत उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेची काय कारणं? का घडली चेंगराचेंगरी?
चेंगराचेंगरीनंतर थलपती विजय रुग्णालयात जखमींना भेटायचं सोडून चार्टर्ड प्लेननं चैन्नईला रवाना झाला. दुर्घटनेनंतर केंद्राच्या गृह विभागानं राज्याकडे या दुर्घटनेचा अहवाल मागवला आहे. चेंगराचेंगरी का घडली, या कारणांचा आता शोध घेण्यात येत आहे.
1. करुरमध्ये रॅलीपूर्वीच्या रोड शोला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरीही रोड शो
2. रोड शो आणि रॅलीसाठी केवळ 10 हजारांची परवानगी, प्रत्यक्षात 50 हजारांहून जास्त गर्दी
3. दुपारपासून विजयची एक झलक पाहण्यासाठी गर्दी ताटकळली, विजय सात तास उशिराने पोहचला
4. विजय बसलेली 60 फुटी बस प्रचंड गर्दी असलेल्या रस्त्यावर नेण्यात आली
5. विजयला पाहण्यासाठी गर्दी बसच्या दिशेने सरकू लागली, त्यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती
6. गरमी आणि गर्दीमुळे अनेकांना श्वास घेता येईना, अनेक जणं बेशुद्ध पडले
7. धावपळीत अनेक लहान मुलं पालकांपासून दुरावली, त्यांचा शोध सुरु केल्यानं अधिक चेंगराचेंगरी
8. पोलीस आणि गर्दी नियंत्रणासाठी पक्षाच्या स्वयंसेवकांची अपुरी संख्या
9. खाली पडलेल्यांना तुडवून गर्दी बसच्या दिशेनं सरकत राहिली
थलपती विजय आणि स्थानिक प्रशासनानं योग्य दक्षता घेतली नसल्यानं हा प्रकार घडल्याचा दावा आता करण्यात येतोय.
थलपती विजय हा दाक्षिणात्य अभिनेता असून काही काळापूर्वी त्यानं राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे.
थलपती विजयची कारकीर्द
1. थलपती विजय दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि राजकारणी
2. 1992 पासून अनेक हिट चित्रपट, प्रेक्षकांचा आवडता अभिनेता
3. विजयची एकूण मालमत्ता 600 कोटींच्या घरात
4. चैन्नईतील नीलंकराी बंगला बहुचर्चित मालमत्ता
5. अनेक लक्झरी कारचंही विजयकडे कलेक्शन
6. फेब्रुवारी 2024 साली तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) पक्षाची स्थापना
7. विधानसभा निवडणुकांसाठी टीव्हीके पक्षाची तयारी सुरु
8. द्रमुक, भाजपाविरोधी भूमिका घेत विधानसभेत लढण्याची तयारी
या दुर्घटनेनं आणि नंतरच्या वागणुकीनं विजयवर टीकेची झोड उठते आहे.
दुर्घटनाग्रस्तांना भरघोस मदत
दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना तामिळनाडू सरकारनं प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केलीय. तर जखमींना एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर अभिनेता विजय यानं या दुर्घटनेनं वेदना झाल्याचं सांगत मृतांना 20 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार मदतीची घोषणा करण्यात आलीय.
चेंगराचेंगरीवरुन राजकारण
आता या चेंगारचेंगरीला जबाबदार कोण यावरुन राजकारण सुरु झालेलं आहे. राज्य सरकारच या दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप विजय थलपतीनं केलाय. तर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत राज्य सरकार या प्रकरणाचा तपास करणार आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना घडलेल्या या दुर्घटनेनं तामिळनाडूचं राजकारण आता तापताना दिसतंय.