उर्वशी रौतेला ते युवराज सिंगपर्यंत, सट्टेबाजी अ‍ॅप प्रकरणात बडे अभिनेते अन् क्रिकेटर चौकशीच्या फेऱ्यात

येत्या काही काळात काही अभिनेते आणि क्रिकेटर्सच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली तर आश्चर्य वाटायला नको.

मुंबई – येत्या काही काळात काही अभिनेते आणि क्रिकेटर्सच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली तर आश्चर्य वाटायला नको. या अभिनेत्यांच्या आणि क्रिकेटर्सच्या कोट्यवधींच्या संपत्ती ईडी भविष्यात जप्त करण्याची शक्यता आहे. ही कारवाई पीएमएलए कायद्यांतर्गत होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन बेटिंग अॅप असलेल्या 1xBet च्या प्रमोशनच्या प्रकरणात ही कारवाई होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

1xBet अॅपच्या माध्य़मातून मिळालेल्या जाहिरातींच्या पैशांचा वापर काही सेलिब्रिटीजनी वेगवेगळ्या प्रकारच्या संपत्ती खरेदी करण्यात केलाय. ईडीनं कारवाई केल्यास अशा संपत्तींना अपराधाच्या पैशांतून खरेदी केलेल्या संपत्ती मानलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही आठवड्यात 1xBet अॅप प्रकरणात क्रिकेट युवराज सिंग, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, शिखर धवन, अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि अंकुश हाजरा अशा सेलिब्रिटींची चौकशी केली आहे. यासह काही ऑनलाईन इन्फ्ल्युअन्सर्सही चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत.

सट्टेबाजी प्रकरणात बँक अकाऊंट आणि ट्रान्झॅक्शनची माहितीही समोर

ईडीनं खेळाडू, अभिनेते आणि इन्फ्युअन्सर्स यांचे जबाब मनी लाँड्रिंग कायद्याच्या कलम 50 च्या अंतर्गत घेतले आहेत. अनेक सेलिब्रिटीजनी त्यांच्या बँक अकाऊंटच्या आणि ट्रान्झक्शनच्या डिटेल्सही दिले आहेत. यातून त्यांना 1xBet अॅपच्या जाहिरीतीचे पैसे कसे मिळाले, हे समोर आले आहे. या प्रकरणी अजून काही क्रिकेटर्स आणि सेलिब्रिटींची चौकशी होणार आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला (1xBet ची अॅम्बेसेडर) हिलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. परदेशात असल्याचं सांगितल्यानं तिची या प्रकरणात अद्याप चौकशी झालेली नाही.

कोट्यवधींचा घोटाळा आणि टॅक्सचोरीचा आरोप

हे प्रकरण 1xBet या बेकायदेशीर अॅपशी संबंधित आहे. या कंपनीवर आरोप आहे की, त्यांनी अनेक नागरिक आणि गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये लुटले आहेत. या सगळ्यात मोठ्या प्रमाणात टॅक्स चोरी झाल्याचाही आरोप आहे. कंपनीचा दावा आहे की 1xBet ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकी आहे, तसंच ही कंपनी गेल्या 18 वर्षांपासून बेटिंग इंडस्ट्रीत कार्यरत आहे. यात ग्राहक हजारो खेळांच्या आयोजनावर बेटिंग करु शकतात. कंपनीची वेबसाईट आणि अॅप 70 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. 1xBet अॅप हे चान्स बेस्ट गेम्स अॅप आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News