भारत-पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर, पीओकेतील दहशतवादी तळ सैन्याच्या निशाण्यावर, पाकिस्तानकडून काश्मिरात सेक्टर 15 मध्ये हल्ला

Smita Gangurde

नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. २६ निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूनंतर, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी संपूर्ण देशातून होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनीही हा हल्ला करणाऱ्यांना आणि त्यांच्या आकांना सोडणार नाही, असा थेट इशारा दिलेला आहे. सिंधू जल करार रद्द करण्यासोबतच, देशातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासारखे कठोर निर्णय भारतानं घेतलेत. दुसरीकडे पाकिस्तानकडूनही युद्धाच्या वल्गना सुरु आहेत. काश्मीर सीमेवर दोन्ही बाजूंनी युद्ध सज्जता सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. तिन्ही सैन्यदलांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशा स्थितीत युद्ध झालं तर भारताच्या टार्गेटवर पीओके असेल, अशी माहिती आता समोर येतेय.

पीओकेत कुठे करणार हल्ला?

पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मिरात भारताकडून हल्ला होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे. पीओकेत दहशतवाद्यांचे तळ मोठ्या संखअयेनं आहेत. त्यातील ४२ सक्रिय दहशतवादी तळांवर हे हल्ले होणार असल्याचं सांगण्यात येतंय. याबाबतची कागदपत्रं तपास आणि गुप्तचर यंत्रणांनी पंतप्रधान आणि केंद्राला सादर केल्याची माहिती आहे.

या दशतवादी तळांवर प्रत्येक ठिकाणी १०० ते १५० दहशतवादी तळ ठोकून असल्याची माहिती आहे. या तळांवरुन सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न सातत्यानं होत असतो. लष्कर, हिजबुल आणि जैशचे दहशतवादी या परिसरात असल्याची माहिती आहे.

पाककडून कांगावा सुरुच

दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असून सीमेवर अनेक भागात गोळीबार होत असल्याची माहिती आहे. या गोळीबारातून पाकिस्तानी घुसखोर काश्मीरमध्ये घुसवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. भारतीय सैन्यदलातर्फे पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात येतंय. जे दहशतवादी आणि स्लीपर सेल पहलगाम हल्ल्यात सहभागी होते, त्यांच्या घरांवर बॉम्ब टाकून सैन्यानं ती उद्ध्वस्त केली आहेत.

काश्मीरच्या सेक्टर 15 मध्ये पाकिस्तानचा हल्ला

पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं संधी साधत जम्मू आणि काश्मीरच्या सेक्टर 15 परिसरात काही ठिकाणी रॉकेटनं हल्ला केल्याची आणि गोळीबार केल्याची माहिती आहे. यात उरी, नौगा,.कुपवाडा, तंगधार तर जम्मूतील पुंछ, अखनूर या भागांचा समावेश आहे. यातील अनेक गावांनी कम्युनिटी बंकरचा आश्रय घेतल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या