किश्तवाड– जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात चशोटी गावात गुरुवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. या ढगफुटीत वाहून आलेल्या चिखलात आणि पाण्यात अनेक नागरिक वाहून गेलेत. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत या दुर्घटनेतून 65 जणांना वाचवण्यात आलंय. मात्र तरीही 200 जणं अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे.
चशोटी गावात हजारो भाविक मचैल माताच्या यात्रेत आले असताना ही दुर्घटना घडली. मचैल यात्रेचा हा पहिला मुक्काम होता. यात्रा सुरु होणार होती त्याच ठिकाणी ढगफुटी झाली. भाविकांच्या बस, टेन्ट, लंगर आणि दुकानं या पाण्यात वाहून गेली.
नेमकी दुर्घटना कुठे घडली?
किस्तवाड शहरापासून 90 किमी अंतरावर चशोटी हे गाव आहे. मचैल माता मंदिराच्या रस्त्यावरचं हे पहिलं मोठं गाव आहे. ही जागा पड्डर खोऱ्यात आहे, जी 14 ते 15 किमी आतल्या बाजूला आहे. या परिसरात डोंगर 1818 मीटरपासून ते 3888 मीटर उंच आहेत. इतक्या मोठ्या उंचीवर बर्फाचे ग्लेशियर आहेत आणि दऱ्या आहेत. पाण्याचा प्रवाह यामुळे अधिक वेगवान होतो.
मचैल माताची यात्रा दर वर्षी ऑगस्टमध्ये भरते. या यात्रेसाठी हजारो भाविक या ठिकाणी दाखल होतात. हा मार्ग जम्मू पासून किश्तवाडपर्यंत 210 किमी लांब आहे. पद्दर ते चशोटी या 19.5 किमी मार्गावर गाड्या जाऊ शकतात. त्यांनतर 8.5 किमी यात्रेसाठी पायी जावं लागतं.
सैन्यदलाकडून बचावकार्य
चिसोटी गावात ढगफुटी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाकडून बचावकार्य वेगानं सुरु करण्यात आलं आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ढगफुटी झालेल्या परिसरात ढिगारे उपसण्याचं आणि नागरिकांसाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. भारतीय सैन्यदलाच्या मदतीनं हे बचावकार्य सुरु करण्यात आलंय. वाचलेल्या नागरिकांना मदतीचं सामान, डॉक्टरांची उपलब्धता, मदतीची उपकरणं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
स्वातंत्र्य दिनाचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेनंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं होणारी चहा पार्टी आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याची आदेश दिलेत. तर काँग्रेस पक्षानं बचावकार्य गतीनं करावं, असं आवाहन केलं आहे.





