पंजाब नॅशनल बँक घोटाळा हा भारतातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यांपैकी एक मानला जातो. या घोटाळ्यात प्रमुख आरोपी म्हणून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची नावे पुढे आली. त्यांनी बँकेच्या अधिकार्यांच्या मदतीने बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग काढून हजारो कोटी रुपयांची फसवणूक केली. या घोटाळ्यामुळे बँकेची प्रतिष्ठा धोक्यात आली आणि गुंतवणूकदारांचा विश्वास हादरला. आता याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. मेहूल चोक्सीच्या प्रत्यार्पणसाठी भारत सरकारकडून खरंतर विशेष प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत आता बेल्जियमच्या कोर्टाकडून एक महत्वपूर्ण निकाल समोर आला आहे.
मेहूल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा?
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोकसीला भारतात परत आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बेल्जियमच्या न्यायालयाने चोकसीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे की, भारतीय विनंतीनुसार बेल्जियम पोलिसांनी केलेली चोकसीची अटक वैध आहे. चोकसीकडे अजूनही उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, त्यामुळे त्याला तात्काळ भारतात आणले जाणार नाही; मात्र, हा भारतासाठी पहिला आणि महत्त्वाचा विजय आहे. या प्रकरणात न्यायालयाने अभियोजन पक्ष आणि चोकसीचे वकील या दोघांचीही बाजू ऐकून घेतली.

पीएनबी बँक घोटाळा नेमका काय?
मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदीवर 13,850 कोटी रुपयांच्या PNB बँक घोटाळ्याचा आरोप असून दोघांनी मुंबईतील पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेतून बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज आणि फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिटद्वारे बँकेला कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. दोघांनी PNB च्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट हमी म्हणजे LoU जारी केल्या. या हमींच्या आधारे कोणत्याही हमीशिवाय परदेशातील बँकांकडून कर्जे घेण्यात आली. बँक कर्जातून मिळालेले पैसे विविध शेल कंपन्यांना (बोगस कंपन्या) हस्तांतरित करण्यात आले आणि हे पैसे मनी लाँड्रिंग आणि बनावट व्यावसायिक व्यवहारांसाठी वापरले.
मेहूल चोक्सीबद्दल थोडक्यात माहिती
गीतांजली ग्रुपचे माजी अध्यक्ष मेहुल चोक्सीची एकेकाळी देशातील सर्वात मोठी दागिन्यांची किरकोळ विक्री साखळी होती आणि 4 हजारांहून अधिक दुकाने होती. 5 मे 1959 रोजी जन्मलेल्या चोक्सी यांनी 1985 मध्ये वडील चिनुभाई चोक्सी यांचा हिऱ्यांचा व्यवसाय हाती घेतला. त्यांनी देशभरात हिऱ्यांचा व्यवसाय वेगाने वाढवला आणि दागिने उद्योगात मोठं नाव कमावलं.











