Bihar Politics : बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या व्होट मतदार अधिकार यात्रेदरम्यान दरभंगा इथे पंतप्रधान मोदी यांच्या आईबदद्ल अपमानजनक भाषा वापरण्यात आली. यानंतर एनडीएच्या घटकपक्षांनी 4 सप्टेंबरला बिहार बंदची हाक दिली. घटकपक्षातील महिला याविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत हा बंद पुकारण्यात आला. पंतप्रधान मोदींनीही या अपमानजनक विधानावर बोलताना, बिहारमधले लोक राजद आणि काँग्रेस या पक्षांना कधीही माफ करणार नाहीत, असं म्हटलंय. याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी भावुक झालेले पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित असलेल्या भाजपा नेत्यांच्या आणि महिला नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचंही पाहायला मिळालं.
पीएम नरेंद्र मोदीही झाले भावुक…
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जे ‘भारतमातेचा’ अपमान करू करतात तेच माझ्या आईबद्दल असे बोलले. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. माझ्या दिवंगत आईचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता, मग आईचा काय दोष; आईचा अपमान का करण्यात आला? बिहार ही जानकी मातेची भूमी आहे. तिने नेहमीच महिलांचा आदर केला आहे. ही ती भूमी आहे जिथे छठ पूजा साजरी केली जाते. राजद आणि काँग्रेसच्या व्यासपीठावरून माझ्या आईवर अपशब्द वापरण्यात आले. असे काही घडेल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. बिहारच्या माता आणि मुलींचा हा अपमान होता. राज्यातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही.

बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. एखाद्याच्या आईबद्दल अपशब्द वापरणं चुकीचं आहे, पण भाजप नेत्यांचा इतिहासच हा महिलांबद्दल अपमानजनक शब्द वापरण्याचा आहे, असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला आहे.
निवडणुकांच्या तोंडावर बिहारमध्ये वादंग..
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. बिहारमध्ये महिला सुरक्षितता हा आतापर्यत निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा राहिलाय. नितीश कुमार यांनी महिलांचं शिक्षणाचं प्रमाण वाढावं म्हणून सायकल वाटप केलं. त्यामुळे मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं. शिक्षण घेतलेल्या मुलींना नोकरी मिळावी म्हणून सरकारी नोकरीत 35 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. आज बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण अधिक आहे. पोलीस दलातही हे प्रमाण वाढलं. त्याचबरोबर बिहारमध्ये महिलांना होणाऱ्या त्रासाचा विचार करता दारूबंदीचा निर्णयही सरकारने घेतला. याशिवाय विशेष अनुदानित योजना राबवल्या.
त्यामुळं बिहारमध्ये एनडीए सरकारला महिला वर्गाकडून मिळणारा पाठिंबा लक्षात घेत एनडीएने मोदींच्या आई संदर्भात वापरलेल्या अपमान जनक शब्दांना आता राजकीय मुद्दा बनवलंय. बिहारमध्ये इंडिया आघाडीने व्होट चोरीचा मुद्दा हाती घेतलाय. तर एनडीएने महिला सुरक्षिततेचा मुद्दा लावून धरलाय.. कारण आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी असो की ममता बॅनर्जी किंवा बिहारमध्ये नितीश कुमार. ज्या नेत्यांनी महिला मतदारांसाठी विशेष योजना राबवल्या, त्या नेत्यांच्या सत्तेचा सूर्य कधीही मावळला नाही. त्यामुळे आता हे पाहायचंय, की बिहारच्या जनतेला नेमकं काय भावतं.. बिहारच्या निवडणुकीचा कौल आई ठरवणार का, असा प्रश्नही विचारला जात आहे.











