बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपानं धर्मेंद्र प्रधान यांना प्रभारीपद दिलं, मुरलीधर मोहोळ यांच्याकडेही मोठी जबाबदारी

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्या आणि केंद्रीय जलशक्तीमंत्री सी आर पाटील यांच्याकडे सह प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

नवी दिल्ली – आगामी बिहार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधामसभा निवडणुकांची तयारी भाजपानं सुरु केली आहे. या निवडणुकांसाठी प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केलीय. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आलीय. तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्या आणि केंद्रीय जलशक्तीमंत्री सी आर पाटील यांच्याकडे सह प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वन मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या प्रभारीपदाची जबाबदारी

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार यांच्याकडे सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह तामिळनाडूचे भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्याकडे तामिळनाडूच्या निवडणुकांसाठी प्रभारीपद देण्यात आलं आहे. तर केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बिहारमध्ये यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. सध्या नितीश कुमारांचा जेडीयू पक्ष आणि भाजपा आघाडीचं सरकार या ठिकाणी सत्तेत आहे. तर 2026 च्या मार्चमध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत निवडणुका होतील. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची तृणमूल पार्टी सत्तेत आहे. तर तामिळनाडूत डीएमके सत्तेत आहेत.

बिहारच्या निवडणुकांनंतर भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणार

बिहारच्या निवडणुकांनंतर भाजपाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात येईल असं सांगण्यात येतंय. यात धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र प्रधान या दोघांची नावं चर्चेत आहेत. या दोन्ही नेत्यांकडे त्यापूर्वी बिहार आणि पश्चिम बंगाल या महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या निवडणुकांमध्ये भाजपानं चांगली कामगिरी केली तर या दोघांपैकी कुणाची निवड करतात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येते, अशीही चर्चा सध्या रंगलीय


About Author

Smita Gangurde

Other Latest News