काबूल- अफगाणिस्तानमध्ये कट्टरपंथीय तालिबानची सत्ता असतानाही महिला कॉस्मेटिक सर्जरी करतायेत आणि ही संस्कृती गतीनं लोकप्रिय होत असल्याचं समोर आलंय. अफगाणिस्तानातील सुमारे 20 क्लिनिकमध्ये बोटॉक्स ( चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याचं इंजेक्शन), फेसलिफ्ट ( सैल त्वचा घट्ट करण्यासाठीचं इंजेक्शन) आणि हेअर ट्रान्सप्लांटसारख्या सुविधा देण्यात येत आहेत. या क्लिनिकमध्ये पुरुषांसोबत महिलाही मोठ्या प्रमाणावर येतायेत.
महिला बुरख्यात मात्र सौंदर्यासाठी सर्जरी
साधारणपणे या क्लिनिकमध्ये येणारे पुरुष हे टक्कल कमी करण्यासाठी हेअस ट्रान्सप्लांट करत असल्याचं दिसतंय. तर महिला मात्र फेसलिफ्ट आणि इतर सर्जरी करुन घेत असल्याचं सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे अफगाणिस्तानातील महिला या बुरख्यात असतात, तरीही सौंदर्यासाठी महिला अशा महागड्या सर्जरी करतायेत. रारझानी काबूलमध्ये बंदी असतानाही 20 कॉटस्मेटिक सर्जरीचे क्लिनिक सुरु असल्याचं समोर आलंय.

बोटॉक्स अंडर बुरखा ट्रेंडिंगमध्ये
अफगाणिस्तानातील महिलांमध्ये बोटॉक्ससारख्या उपायांची क्रेझ निर्माण झालेली पाहायला मिळते आहे. अनेक महिला तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अशा प्रकारच्या सर्जरी करवून घेत आहेत. हे प्रकार वाढीस लागल्यानं सोशल मीडियावर बोटॉक्स अंडर बुरखा हे ट्रेंड होतंय.
2023 साली तालिबानकडून ब्युटी पार्लरवर बंदी
सत्तेत आल्यानंतर जुलै 2023मध्ये तालिबाननं देशातील ब्युटी पार्लर आणि सलून बंद करण्याचे आदेश काढले होते. एका महिन्यात सर्व ब्युटी पार्लर बंद करा, असं सांगण्यात आलं होतं. त्यावेळी एकट्या काबूलमध्ये 12 हजार ते 13 हजार ब्युटी पार्लर होते. ज्या ब्युटी पार्लरमधून अफगाणी महिलांना उत्पन्न मिळत होतं, तसचं महिलांना एकत्र येण्याचं आणि एकमेकींशी बोलण्याचं हे चांगलं निमित्तही होतं.
हे ब्युटी पार्लर अफगाण महिलांसाठी स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता यांचं प्रतीक होते. मात्र तालिबाननं सत्तेत आल्यानंतर नैतिकतेच्या कारणानं हे ब्युटी पार्लर बंद केले.
वैद्यकीय उपचार म्हणून आता होतायेत चेहऱ्यांच्या सर्जरी
सलून आणि ब्युटी पार्लर बंद झाल्यानंतर कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्या क्लिनिकमध्ये आता महिलांची गर्दी वाढताना दिसते आहे. वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया असल्यानं यात तालिबान हस्तक्षेप करु शकत नाही. सरकार या व्यवसायात हस्तक्षेप करत नसले तरी पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या नर्स असाव्यात याकडं सरकारचं लक्ष आहे.
तुर्कीतील डॉक्टर देतायेत डॉक्टरांना प्रशिक्षण
या क्लिनिकमध्ये होणारे उपाय, लाभ आणि वाढलेल्या या व्यवसायात इतर देशांचाही मोठा वाटा असल्याचं समोर येतंय. तुर्कीसारख्या देशांतून या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर अफगाणिस्थानात येऊन इथल्या डॉक्टरांना याचं प्रशिक्षण देतायेत. तर अनेक अफगाण डॉक्टर्स इस्तांबूलमध्ये यासाठी प्रशिक्षण घेतायेत. या क्लिनीकमध्ये वापरण्यात येणारी सामुग्री आशिया आणि युरोपमधून आयात करण्यात येतेय