मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाला या विजयादशमीपासून सुरुवात होणार आहे. शताब्दी वर्षात संघकार्याचा विस्तार आणखी वाढावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 2 ऑक्टोबर 2025 ते 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत शताब्दी वर्षानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन संघाच्या वतीनं करण्यात येणार आहे.
विजयादशमीला नागपुरात शक्तिप्रदर्शन
नागपुरात विजयादशमीच्या दिवशी 100 वर्षांपूर्वी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली होती. तेव्हापासून दरवर्षी नागपुरातील विजयादशमीच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. यावर्षीच्या कार्यक्रमात राज्य आणि देशभरातून २५ हजारांपेक्षा जास्त संख्येनं स्वयंसेवक उपस्थित असतील, असा अंदाज आहे. यावेळी सरसंघचलाक मोहन भागवत हे शताब्दीनंतर संघाची पुढची दिशा काय असेल हे स्पष्ट करणार आहेत.

संघाच्या शताब्दी वर्षात संघाचे प्रचारक असलेले नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर आहेत. सरसंघचालकांच्या भाषणात देशाच्या सुरक्षेचे आणि जागतिक पातळीवर सांस्कृतिक नेतृत्वाचा उल्लेख असेल. त्यासोबतच ऑपरेशन सिंदूर, जातीय जनगणना, समान नागरी कायदा यासारख्या विषयांचाही उल्लेख असण्याची शक्यता आहे.
शताब्दी वर्षात संघाचे सहा मुख्य मुद्दे
शताब्दी वर्षात संघ समाजात अधिकाधिक विस्तारासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सहा बिंदू निश्चित करण्यात आले आहेत.
१. कार्यविस्तार- पुढील वर्षभरात देशातील सर्व तालुके ग्रामीण भागात विस्तारण्यासाठी संघ प्रयत्न करणार आहे. यासाठी शताब्दी वर्षासाठी काही विस्तारक म्हणून देशभरात संघाच्या कार्याचा प्रसार करणार आहेत. संघ शाखांवर असलेली संख्या वाढवणे, प्रत्येक वस्ती आणि मंडल स्तरावर शाखा सुरू करणे अशी कार्यविस्ताराची उद्दिष्ट ठेवण्यात आली आहेत.
२. कार्याची गुणवत्ता, हिंदू संमेलनं – कार्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी वस्ती आणि मंडल स्तरावर प्रयत्न होणार आहेत. स्थानिक पातळीवर सामाजिक नेतृत्व निर्माण करण्यासाठी संघ पुढील वर्षभर प्रयत्न करणार आहे. पुढील वर्षभरात प्रत्येक वस्ती आणि मंडल स्तरावर हिंदू संमेलनं आणि युवा संमेलनं आयोजित करण्यात येणार आहेत. यातून अधिकाधिक वर्गापर्यंत संघाची ओळख पोहचवणे आणि नवे स्वयंसेवर कार्यरत होतील, यासाठी प्रयत्न होणार आहेत.
३. जुन्या स्वयंसेवकांना काम – संघाच्या शाखांवर जाऊन आलेले लाखो स्वयंसेवक देशात आहे. यातील अनेक स्वयंसेवक सध्या आपआपल्या कार्यात मग्न आहेत. येत्या वर्षभरात अशा स्वयंसेवकांना संपर्क करुन त्यांना पुन्हा सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कार्यरत ठेवण्यासाठी पुढील वर्षभर प्रयत्न होतील.
४. सज्जनशक्तीशी संपर्क- संघाशी संबंधित नसलेल्या अनेक व्यक्ती देशभरात विविध सामाजिक उपक्रमात कार्यरत आहेत. अशा सज्जनशक्तीशी संपर्क करुन त्यांना संघाचा परिचय करुन देण्याचा प्रयत्न पुढील वर्षात असेल. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक घरात शताब्दी वर्षानिमित्त संपर्क होईल, असं नियोजन करण्यात आलेलं आहे.
५. समाज प्रबोधन – संघाच्या माध्यमातून निरनिराळ्या विषयांवर समाजप्रबोधन करण्याचे ध्येय वर्षभरात ठेवण्यात आलं आहे. त्याची पंचसूत्री निश्चित करण्यात आली असून हे पाच मुद्दे घेऊन समाजप्रबोधन करण्यात येणार आहे. त्यात स्वदेशी, समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन आणि नागरी कर्तव्य अशा पाच विषयांवर समाजात प्रबोधन करण्यात येईल
६. नकारात्मकता नाहिशी करणे – समाजात अजूनही काही समाजविधातक कारवाया आणि विचार पसरवण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे समाजात निर्माण होणारी नकारात्मकता नाहिशी करण्यासाठी येत्या वर्षभरात प्रयत्न करण्यात येतील. पुढील विजयादशमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात करण्याचा संघाचा मानस आहे.
मुंबईत सरसंघचालकांचं व्याख्यान
२०१८ आणि 2025 साली संघाची माहिती समाजाला व्हावी, त्यासह संघाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तीन दिवसांच्य़ा व्याख्यानाचे आयोजन दिल्लीत करण्यात आले होते. तशीच व्याख्यानं मुंबईत दोन दिवस करण्यात येणार आहेत. 7 आणि 8 फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईतील प्रतिष्ठीत मान्यवरांशी संघाबाबत संवाद साधणार आहेत