पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्षाचा भडका उडाला आहे. दोन्ही देशात चमन सीमेवर भीषण गोळीबार झाला आहे. यामुळे सीमावर्ती भागांमध्ये सध्या घबराट पसरली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जोरदार गोळीबारा झाला. सध्या या गोळीबारामुळे कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. मात्र या चकामकीमुळे दोन्ही देशांत युद्ध सुरु होऊ शकते अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दोन्ही देशांनी एकमेकांवर सुरुवातील गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. चमन सीमेदवळी पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधून झालेल्या गोळीबाराचे प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. सध्या या गोळीबारामुळे प्रमुख वाहतूक मार्ग बंद झाला आहे. दुसरीकडे तालिबानने या गोळीबारासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे.

कंधारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी संघर्ष
आफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. सलग दुसऱ्या रात्री देखील आफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सैन्यात कंधार प्रांतातील स्पिन बोल्दाक येथे भीषण संघर्ष पाहायला मिळाला. या सघर्षामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे 80 जण जखमी झाले आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर विनाकारण हल्ला केल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे दोन्ही देशांमध्ये वाढता संघर्ष पाहता सीमावर्ती भागात हजारो लोकांना अन्न आणि वैद्यकीय साहित्याचा तुटवडा जाणवत आहे. अफगाण सैन्याने पाकिस्तानमधील मजल गली आणि लुकमान गावांमध्ये मोर्टार डागले, घरांना आग लावली आणि लोकांना जीव वाचवण्यासाठी पळून जाण्यास भाग पाडले, असे आरोप आहेत. दोन्ही देशांनी आता लोकांना सीमावर्ती भागातून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या आठवड्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील शांतता चर्चा अयशस्वी झाली. दोन दिवसांनंतर, 5 डिसेंबरच्या रात्री, अफगाण सैन्य आणि तालिबानी दहशतवाद्यांनी ड्युरंड रेषेवर गोळीबार केला. त्यांनी स्लिप बोल्दाक भागात पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले, नंतर रॉकेट आणि मोर्टार डागले. पाकिस्तानी सैन्याने गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. 7 डिसेंबरच्या रात्रीही अशीच चकमक झाली.
संघर्षाचे मुळ कारण नेमकं काय ?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमा संघर्षाची ही पहिलीच वेळी नाही. पूर्वी इस्लामिक भांवडे म्हटली जाणारे देश आज एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. पाकिस्तान अफगाणिस्तानवर पाकिस्तानी तालिबानच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटांना त्यांच्या भूभागावर आश्रय देत असल्याचा आरोप करतो. तर दुसरीकडे अफगाणिस्तान पाकिस्तानवर खोटा इस्लामाच्या प्रचाराचा आरोप करतो. शिवाय २०११ मध्ये अमेरिकेसोबत झालेल्या संघर्षात पाकिस्तानने अफगाणिस्ताना पाठ दाखवली होती. तेव्हापासून दोन्ही देशांत कायमस्वरुपी तणाव आहे.











