दिल्ली लाल किल्ला स्फोटात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. एनआयएने आय20 कारचा मालक आमिर रशीद याला अटक केली आहे. आमिरने डॉ. उमरसोबत मिळून दिल्लीत दहशत माजवण्याचा धोकादायक कट रचला होता. आमिर हा जम्मू आणि काश्मीरमधील पंपोर येथील सांबुरा येथील रहिवासी आहे. आत्मघातकी हल्लेखोराने कारमध्ये स्फोट घडवण्यासाठी आयईडीचा वापर केला, ज्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आणि 32 जण जखमी झाले, असा महत्त्वपूर्ण खुलासा एनआयएने केला आहे.
आय 20 कारचा मालक अटकेत; कटात सहभाग
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएला मोठी कारवाई करण्यात यश आलं आहे. या आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा दहशतवादी कट रचणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आमिर रशीद अली असं अटक करण्यात आलेला आरोपीचच नाव आहे. स्फोटात वापरलेली कार त्याच्या नावावर नोंदणीकृत होती. एनआयएने त्याला दिल्लीत अटक केली. सुरुवातीला दिल्ली पोलीस स्फोटाचा तपास करत होते. परंतु, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. एनआयएने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली, ज्यामध्ये आमिरला अटक करण्यात आली.

पोलीस आणि यंत्रणांकडून सखोल तपास सुरू
दिल्ली पोलिस, हरियाणा पोलिस, उत्तर प्रदेश पोलिस आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी इतर एजन्सींच्या सहकार्याने 73 साक्षीदारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ज्यात अनेक जखमींचा समावेश आहे. अनेक राज्यांमध्ये तपास सुरू आहे. कारण अधिकारी व्यापक कट उघड करण्यासाठी आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांची ओळख पटवण्यासाठी सुगावा शोधत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात आणखी काही मोठे खुलासे होतात का, हे पाहणे खरंतर महत्वाचे ठरणार आहे.