Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भारतीय सैन्य दलाला एक आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली आहे. भारतीय सैन्यदलाच्या ९२ बेस हॉस्पीटलला भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून सिंदूर महारक्तदान यात्रेत सहभाग नोंदवला. तसेच सांगली येथील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनी या ‘सिंदूर महारक्तदान यात्रे’च्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
१ हजार पैलवानांकडून रक्तदान…
दरम्यान, या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील श्रीनगर येथे आले. तिथे पोहोचताच त्यांनी थेट ९२ बेस हॉस्पीटलला भेट देऊन रक्तदान केले. त्यांच्यासह सांगली जिल्ह्यातील एक हजार पैलवान या यात्रेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत, रक्तदान केले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी श्रीनगर येथे जाऊन रक्तदान करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार ते आणि त्यांचे सर्व सहकारी दोन दिवसांपूर्वीच श्रीनगर येथे पोहोचले. यावेळी शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
…म्हणून आम्ही सुखाने जगतो
यावेळी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी रक्तदान केल्याबद्दल शिंदे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. तसेच शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल शिंदे यांचे आभार मानले. दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे देशवासियांच्या वतीने अभिनंदन करून त्यांचे आभार मानले. तुम्ही इथे दक्ष असता म्हणून आम्ही सुखाने जगू शकतो, असे सांगत प्रत्येक सैनिकाप्रती त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.





