MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

AI चा काळ सुरू; सज्ज व्हा! AI च्या दुनियेत कोण सुरक्षित, धोका कुठे? आवश्यक कौशल्ये कोणती? जाणून घ्या सगळं काही…!

Written by:Rohit Shinde
Published:
आता एआय (AI) थेटपणे माणसांच्या नोकऱ्या कमी करताना दिसत आहे, आगामी येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज होण्याची गरज आता निर्माण झाली आहे. जाणून घेऊया सर्व काही....
AI चा काळ सुरू; सज्ज व्हा! AI च्या दुनियेत कोण सुरक्षित, धोका कुठे? आवश्यक कौशल्ये कोणती? जाणून घ्या सगळं काही…!

मागील दोन दिवसांत दोन धक्कादायक बातम्या समोर आल्या. त्यामध्ये एआय अर्थात Artificial intelligence मुळे टीसीएस या नामांकित कंपनीने 12 हजार कर्माचारी कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे IBM कंपनीने जवळपास 800 कर्मचारी कमी केले. त्यामुळे आता एआय AI थेटपणे माणसांच्या नोकऱ्या कमी करताना दिसत आहे, आगामी येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज होण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

आज जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्रचंड वेगाने विकसित होत आहे. यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये कामाच्या स्वरूपात मोठा बदल झाला आहे. अनेक पारंपरिक नोकऱ्यांवर AI चा प्रभाव जाणवत आहे, परंतु काही विशिष्ट क्षेत्रे आणि नोकऱ्या अशा आहेत ज्या AI पासून वाचू शकतात, किंवा ज्यात मानवाचे योगदान अपरिहार्य ठरते. तसेच, या AI-युगात यशस्वीपणे टिकण्यासाठी काही कौशल्यांची आवश्यकता असते.

कोणत्या नोकऱ्या किंवा क्षेत्रं AI पासून सुरक्षित ?

  1. सर्जनशील क्षेत्रे (Creative Fields): संगीत, चित्रकला, साहित्य, डिझाईन यासारख्या सर्जनशील क्षेत्रात AI काही अंशी सहाय्य करू शकतो, पण मानवी कल्पनाशक्तीची जागा घेणे त्याला कठीण आहे. त्यामुळे लेखक, कलाकार, आर्किटेक्ट, फिल्म मेकर यांसारख्या व्यावसायिकांना AI पासून तुलनेत अधिक सुरक्षितता आहे.
  2. माणसांशी थेट संवाद असणाऱ्या नोकऱ्या: मानसोपचारतज्ज्ञ, शिक्षक, समाजसेवक, डॉक्टर, नर्स, HR व्यवस्थापक यांसारख्या नोकऱ्यांमध्ये मानवी भावना समजून घेण्याची गरज असते. AI हे करू शकत नाही, त्यामुळे या क्षेत्रात माणसाचे स्थान महत्त्वाचे राहील.
  3. व्यावसायिक निर्णयक्षमता असणाऱ्या नोकऱ्या: AI विश्लेषण करू शकतो, पण कोणत्या निर्णयाचा परिणाम काय होईल याचा अनुभव, रणनीती, व्यावसायिक समज आणि राजकीय-सामाजिक संज्ञा या मानवी क्षमतांचा पर्याय नाही. त्यामुळे CEO, प्लॅनर, वरिष्ठ सल्लागार या पदांवर माणसाचीच गरज राहील.
  4. कौशल्यावर आधारित सेवा नोकऱ्या: शेती आणि जोड-व्यवसाय, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, मेकॅनिक, शिंपी, शेफ अशा सेवा नोकऱ्या ज्या प्रत्यक्ष कामावर आधारित आहेत, त्या AI सध्या किंवा भविष्यात सहज घेऊ शकत नाही.

AI च्या जगात टिकण्यासाठी आवश्यक कौशल्ये

  1. डिजिटल साक्षरता (Digital Literacy): बेसिक कंप्युटर ऑपरेशन, डेटा विश्लेषण, AI चा वापर याची माहिती असणे आवश्यक आहे. Excel, Python, ChatGPT, आणि डेटा टूल्सची ओळख महत्त्वाची ठरते.
  2. सर्जनशीलता आणि इनोव्हेशन: यंत्रे पद्धतशीर काम करू शकतात पण नवकल्पना माणूसच करू शकतो. म्हणून आपल्या कामात नेहमी नव्याने काहीतरी निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे.
  3. सामाजिक कौशल्य (Soft Skills ): संवाद कौशल्य, टीमवर्क, नेतृत्व, भावनिक बुद्धिमत्ता ही मानवी कौशल्ये AI सहज शिकू शकत नाही. यामुळे या कौशल्यांमध्ये पारंगत असणे गरजेचे आहे.
  4. सतत शिकत राहणे (Lifelong Learning): सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानात टिकून राहण्यासाठी सतत नवे शिकणे गरजेचे आहे. नवीन कौशल्ये आत्मसात करणे, कोर्सेस करणे, ऑनलाईन शिक्षण घेणे या सवयी अंगी बाणवाव्यात.
  5. माहिती विश्लेषण (Data Interpretation) : डेटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल, पण त्याचा योग्य अर्थ लावणे, योग्य निष्कर्ष काढणे आणि निर्णय घेणे ही कौशल्ये महत्त्वाची आहेत.

कोणत्या क्षेत्रांना एआयचा सर्वाधिक धोका?

AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मुळे काही विशिष्ट क्षेत्रांतील पारंपरिक नोकऱ्यांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. सर्वप्रथम, आयटी क्षेत्रात कोडींग, माहिती विश्लेषण याला फटका बसू शकतो. डेटा एंट्री ऑपरेटर, कॅशियर, टायपिस्ट, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह अशा नोकऱ्या ज्यात नियमित आणि पुनरावृत्तीची कामे असतात, त्या AI आणि ऑटोमेशनच्या सहाय्याने सहज केले जाऊ शकतात.

याशिवाय, बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील काही प्रक्रिया जसे की कर्ज मंजुरी, व्यवहार विश्लेषण, आणि अकाउंट्स संबंधित कामे सुद्धा AI प्रणालीद्वारे अधिक वेगाने आणि अचूकतेने पूर्ण केली जात आहेत. मीडियामधील संपादन, रिपोर्ट लेखन, तसेच ग्राफिक डिझायनिंगचे टेम्प्लेट आधारित काम देखील AI सॉफ्टवेअर्सच्या साहाय्याने केले जात आहे. तसेच, उद्योगधंद्यांमध्ये असलेले उत्पादन व असेंब्ली लाइनवरचे काम रोबोटिक AI प्रणालींनी घेतले आहे, ज्यामुळे कामगार वर्गाला मोठा धोका निर्माण झाला आहे. हे सर्व क्षेत्र बदलाच्या कड्यावर उभे आहेत. त्यामुळे या क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांनी नव्या कौशल्यांकडे वळण्याची आणि तांत्रिक प्रगतीच्या प्रवाहाशी जुळवून घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा भविष्यात त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे.

AI चा काळ सुरू; सज्ज व्हा !

AI आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे आणि तो अजून प्रगत होत जाईल. आपली नोकरी AI कडून घेण्यात येऊ नये यासाठी आपण सतत शिकत राहणे, नवे कौशल्य आत्मसात करणे, आणि आपल्या मानवी विशेष कौशल्यांवर भर देणे हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे. ज्यांनी बदल स्वीकारून तयारी केली, तेच या AI युगात यशस्वी होतील.