MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकवताना ‘या’ नियमांचे पालन करा; तिरंग्याचा मान राखा!

Written by:Rohit Shinde
Published:
स्वातंत्र्यदिन कायदेशीर आणि सांस्कृतिक दृष्ट्या सन्मानपूर्वक साजरा करण्यासाठी ‘ध्वज संहिता’चे नियम पाळणे बंधनकारक आहे.
स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकवताना ‘या’ नियमांचे पालन करा; तिरंग्याचा मान राखा!

२०२५ मध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. हा दिवस आपल्या देशाला १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्याची आठवण करून देतो. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर गीते सादर केली जातात. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांचा भाषण हा दिवसाचा मुख्य आकर्षण असतो. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभक्ती, ऐक्य आणि प्रगतीचा संदेश देत प्रत्येक भारतीय हा दिवस अभिमानाने साजरा करतो. हा दिवस आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आणि देशसेवेची आठवण करून देतो. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना काही लिखीत आणि अलिखीत अशा नियमांचे पालन करणे अत्यंत जरूरी आहे.

ध्वजारोहण करताना ‘हे’ नियम पाळा!

स्वातंत्र्यदिन कायदेशीर आणि सांस्कृतिक दृष्ट्या सन्मानपूर्वक साजरा करण्यासाठी ‘ध्वज संहिता’चे नियम पाळणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय ध्वज हा खादीच्या कापडाचा असावा, जो हाताने सूत कताई करून आणि हाताने विणलेला असेल. तो कापूस, रेशीम किंवा लोकर या वस्त्रांपासून बनवता येतो. ध्वजाचा आकार नेहमी ३:२ या प्रमाणात असावा आणि त्यातील भगवा रंग वरती, पांढरा मध्ये आणि हिरवा खाली असणे अत्यावश्यक आहे. पांढऱ्या पट्ट्यातील अशोक चक्र स्पष्ट आणि योग्य स्थितीत असावे. ध्वजाचा वापर कोणत्याही प्रकारे पडदा, कव्हर, पोशाख, उशी, रुमाल, टिश्यू किंवा कपड्यांवर छपाईसाठी करणे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. तिरंग्यावर कोणतेही अक्षर लिहिणे किंवा चित्र काढणे मनाई आहे. तसेच ध्वजाने व्यासपीठ, वक्त्याचे टेबल, इमारती किंवा वाहन झाकणे अनुचित आहे. तिरंगा जमिनीवर, पायाखाली किंवा पाण्यात स्पर्श होईल अशा स्थितीत ठेवू नये.

ध्वज फडकवताना तो स्वच्छ, व्यवस्थित आणि योग्य दिशेत असावा. भगवा रंग नेहमी वर राहिला पाहिजे आणि रंगांची जागा बदलणे टाळावे. अशोक चक्र किंवा पट्ट्यांची दिशा चुकल्यास तो तिरंग्याचा अपमान मानला जातो. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिरंग्याचा योग्य सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. हा दिवस केवळ उत्सवाचा नसून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांना अभिवादन करण्याचा आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला तिरंगा फडकवताना नियम पाळा, सन्मान राखा आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करा.

तिरंग्याचा सन्मान म्हणजेच देशाचा सन्मान!

तिरंगा हा आपल्या देशाच्या स्वाभिमानाचा, ऐक्याचा आणि बलिदानाचा प्रतीक आहे. केशरी रंग धैर्य व त्याग दर्शवतो, पांढरा रंग सत्य आणि शांतीचे प्रतीक आहे, तर हिरवा रंग समृद्धी आणि विकासाची भावना जागवतो. मधोमध असलेले अशोकचक्र हे न्याय, प्रगती आणि सततच्या गतिमानतेचे चिन्ह आहे. तिरंग्याचा सन्मान करणे म्हणजे आपल्या देशाच्या गौरवाचे रक्षण करणे होय. राष्ट्रीय ध्वजाची योग्य पद्धतीने उभारणी, हाताळणी आणि संग्रह करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तिरंग्याचा अपमान टाळणे आणि त्याचा आदर राखणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, कारण तिरंग्याचा सन्मान म्हणजेच देशाचा सन्मान.