MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

उद्धव ठाकरेंना धक्का!  साथ सोडलेल्या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश, कागलमधील समीकरणे बदलली

Written by:Arundhati Gadale
Published:
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न कागलमध्ये निर्माण झाला आहे. संजय घाटगे यांच्या भाजप प्रवेशाने उद्धव ठाकरेंकडे कागलमध्ये कुठलाही मोठा नेता शिल्लक राहिलेला नाही.
उद्धव ठाकरेंना धक्का!  साथ सोडलेल्या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश, कागलमधील समीकरणे बदलली

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार संजय घाटगे यांनी ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कागलचे राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. समरजित घाटगे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा असताना घाटगेंनी आधी प्रवेश करून कागलमध्ये भाजपला ताकद दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपमधील समरजितसिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले. तेथून त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले संजय घाटगे यांनी पक्षा विरोधात भूमिका घेत थेट हसन मुश्रीफ यांना पाठींबा दिला होता. मुश्रीफ यांनी देखील घाटगेंच्या मदतीची परतफेड करत त्यांना जिल्हा बँकेचे संचालक केले.

कागलमध्ये भाजपकडे कोणातही मोठा नेता नसल्याची संधी साधत संजय घाटगे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत संधी साधली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अंबरिशसिंब घाटगे हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

समरजितसिंहासाठी भाजपचा दरवाजा बंद?

समरजितसिंह घाटगे यांनी भाजपसोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. विधानसभेतील पराभवानंतर देखील ते भाजपच्या संपर्कात होते. त्यांनी अनेकदा भाजप नेत्यांची भेटी घेतल्याचे देखील उघड झाले होते. मात्र, पक्षप्रवेशाबाबत त्यांचा कोणताही निर्णय झाला नव्हता. अखेर संजय घाटगे यांना प्रवेश देत भाजपने समरजितसिंह घाटगेंसाठी भाजपचा दरवाजा बंद असल्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात?

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न कागलमध्ये निर्माण झाला आहे. संजय घाटगे यांच्या भाजप प्रवेशाने उद्धव ठाकरेंकडे कागलमध्ये कुठलाही मोठा नेता शिल्लक राहिलेला नाही. तर, माजी खासदार संजय मंडलिक यांच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद अजूनही कागल आणि कोल्हापूर परिसरात आहे.