गोवा क्लबमधील आगीचं प्रकरण; क्लबचे दोन्ही मालक इंडिगोच्या विमानाने फरार!

Written by:Rohit Shinde
Published:
गोव्यातील रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ आणि गौरव लुथरा देश सोडून पळून गेले आहेत. घटनेनंतर पाच तासांनी ते मुंबईहून थायलंडमधील फुकेत येथे इंडिगोच्या विमानाने रवाना झाले.
गोवा क्लबमधील आगीचं प्रकरण; क्लबचे दोन्ही मालक इंडिगोच्या विमानाने फरार!

गोवा येथील अरपोरा नाइटक्लबमध्ये भीषण आग लागून तब्बल 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नाईट पार्टीदरम्यान सुरू असलेली मौजमजा काही क्षणांतच आगीच्या तांडवात बदलली. या प्रकरणी क्लबच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे. तर चीफ मॅनेजर आणि आणखी 3 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. 

एफआयआरमध्ये क्लबचे मालक सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा, तसेच कार्यक्रम आयोजक आणि मॅनेजर यांची नावे आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

दोन्ही मालक फरार झाल्याची माहिती

व्यातील रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ आणि गौरव लुथरा देश सोडून पळून गेले आहेत. अग्निकांडाची घटना घडल्यानंतर पाच तासांनी सौरभ आणि गौरव यांनी मुंबईहून इंडिगोच्या विमानानं थायलंडमधील फुकेत गाठलं. गोवा पोलिसांनी याची माहिती दिली आहे. लुथरा परदेशात नेमके कुठे गेले, त्याचा ठावठिकाणा काय, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत घेण्याची योजना आखली आहे.

बर्च बाय रोमियो लेन क्लबला शनिवारी रात्री उशिरा आग लागली. या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास गोवा पोलीस करत आहेत. एफआयआर दाखल होताच पोलिसांचं एक पथक तातडीनं दिल्लीला पोहोचलं. आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी घालण्यात आल्या. पण दोघेही सापडले नाहीत. त्यानंतर त्यांच्या घरांवर कायदेशीर नोटिसा चिकटवण्यात आल्या.

मृतांच्या कुटुंबांना सरकारची मदत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठक घेत नुकसानग्रस्त कुटुंबांसाठी मदत जाहीर केली. त्यामध्ये मृतांच्या नातेवाइकांना 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आगीच्या घटनेचा अधिक तपास सुरू

सुरक्षा नियमांचे उल्लंघन करूनही क्लबला परवानगी देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. मृतांमध्ये 4 पर्यटक, 14 कर्मचारी आणि इतर 7 जणांचा समावेश आहे. अरपोरा-नागोआचे सरपंच रोशन रेडकर यांनाही व्यापार परवान्यासंबंधी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास या प्रकरणाचा सुरू आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews