MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

उत्तर भारतात मुसळधार पावसाचा कहर सुरूच; नद्यांना पूर, शेतीचे नुकसान…नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

Written by:Rohit Shinde
Published:
उत्तर भारतात झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्ली, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कामात व्यस्त आहे.
उत्तर भारतात मुसळधार पावसाचा कहर सुरूच; नद्यांना पूर, शेतीचे नुकसान…नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून खरंतर मुसळधार अशा स्वरूपाच्या पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनत चालली आहे. दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मिर, हिमाचल या भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी खरंतर झाली आहे. हवामान खात्याने येत्या शुक्रवारी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक महामार्ग व मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं असून जनजीवन ठप्प झालं आहे. सुलतानगंज कल्व्हर्ट, शंकरगड कल्व्हर्ट, राम नगर, मानस नगर, साकेत कॉलनी, आवास विकास, लोहा मंडी, कमला नगर, एमजी रोड परिसरासह अनेक भागात जलसंचय झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांत पूर

उत्तर भारतात झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्ली, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमधील भाक्रा धरणाची पातळी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सतलज नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यातच यमुना नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून जुन्या रेल्वे पुलाजवळ ती 207.47 मीटरपर्यंत पोहोचली आहे. गोकुळ बॅरेजमधून सोडण्यात येणाऱ्या लाखो क्युसेक पाण्यामुळे आणि मथुरा-आग्रा परिसरातील पावसामुळे यमुना ओसंडून वाहते आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे परिसरातील घरे, मदत शिबिरे आणि झोपडपट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत.

बुधवारी आग्र्यात या हंगामातील सर्वाधिक पाऊस झाला. सलग तीन दिवसांच्या पावसामुळे शहरातील रस्ते, बाजारपेठा आणि कॉलन्या पाण्याखाली आल्या आहेत. वाहतूक व्यवस्था कोलमडली असून सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पूरस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर मदत पथके तैनात करण्यात आली आहेत. काही ठिकाणी बोटींचा वापर करून तर काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाण्यातून मदत पोहोचवण्यात आली. यमुना बाजार, मयूर विहार फेज-१ आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना आपली घरं सोडून सरकारी शाळांमध्ये आसरा घ्यावा लागला आहे.

दिल्लीतील मुसळधार पावसामुळे यमुनेला पूर

यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीची पाणी पातळी 207 मीटरवर पोहोचली असल्याची माहिती मिळत आहे. यमुना बाजार परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असून एनडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात तैनात आहे. काही भागांमध्ये सुमारे पाच ते सहा फूट पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.