नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे नद्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. काठमांडू, पोखरा, ललितपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेकडो घरे पाण्याखाली गेली असून रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. बचाव पथके सतत काम करत असून, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. नेपाळच्या हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी आणखी पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे भुस्खलन आणि पुरस्थितीत आतापर्यंत 47 नागरिकांनी जीव गमावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
भुस्खलन, पुरामुळे 47 नागरिकांचा मृत्यू
नेपाळमध्ये मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे देशातील अनेक भागात भूस्खलन, पूर आणि विजेच्या धक्यांमुळे किमान 47 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले असून डोंगराळ भागातील वस्त्यांचा संपर्क तुटला आहे.

पूर्व नेपाळमधील इलाम जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला असून, तेथील 35 जणांचा वेगवेगळ्या भूस्खलनांमध्ये मृत्यू झाला आहे. सशस्त्र पोलिस दलाचे प्रवक्ते कालीदास धौबोजी यांनी सांगितले की, नऊ जण बेपत्ता आहेत आणि तिघांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. नेपाळमध्ये अनेक महामार्ग पूर आणि भूस्खलनामुळे बंद झाले आहेत, ज्यामुळे शेकडो प्रवासी रस्त्यांवर अडकले आहेत. काठमांडू विमानतळाचे प्रवक्ते रिंजी शेर्पा यांनी सांगितले की, देशांतर्गत उड्डाणे मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असली तरी आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमित सुरु आहेत.
कोशी नदीला पूर; राजधानीत पुरस्थिती
पूर्व नेपाळातील कोशी नदी धोक्याच्या वरती वाहत असून, प्रशासनाने कोशी बॅरेजचे सर्व 56 दरवाजे उघडले आहेत. सामान्य परिस्थितीत हे दरवाजे 10 ते 12 पर्यंतच उघडे ठेवले जातात. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, अशी माहिती सुनसरी जिल्हाधिकारी धर्मेंद्र कुमार मिश्र यांनी दिली.
काठमांडू शहरातील अनेक नद्या ओसंडून वाहत आहेत, ज्यामुळे रस्ते आणि घरे पाण्याखाली गेली आहेत. राजधानीचा देशाच्या इतर भागांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मॉन्सून हंगामाने नेपाळमध्ये मोठा विध्वंस घडवला आहे. हवामान खात्याने सोमवारपर्यंत पावसाचा इशारा दिला असून, सरकारने बचाव आणि मदतीसाठी विशेष पथके तैनात केली आहेत.











