नवी दिल्ली– दिवाळी आणि इतर सणासुदीच्या काळात तुम्हाला कुणा नातेवाईकाच्या घरी किंवा तुमच्या घरी जायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
दिवाळी आणि सणासुदीच्या काळात रिटर्न तिकीट बुक केलं तर 20 टक्के सवलत मिळणार आहे. भारतीय रेल्वेनं प्रायोगिक तत्वावर सध्या ही योजना सुरु केली आहे. मात्र त्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे तुम्हाला तुमचं जाण्याचं आणि येण्याचं तिकिट एकत्र बुक करावं लागणार आहे. घरापासून लांब राहणाऱ्यांना आणि नियोजन करणाऱ्यांना यायोजनेचा चांगलाच लाभ होणार आहे. सणासुदीच्या काळात तिकीटं मिळवताना प्रवाशांना समस्या उद्भवतात, अनेकांना परतीचं तिकीट मिळत नसल्यानं नाहक त्रासही सहन करावा लागतो. यामुळं रेल्वेनं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय.
ही सवलत मिळवयाची असेल तर काय कराल?
1. एकच ट्रेन जाताना आणि येताना असावी-
जर तुम्हाला अहमदाबादवरुन पाटणाला जायचं असेल तर या प्रवासासाठी एकाच एक्सप्रेसचं तिकिट बुकिंग तुम्हाला करावं लागणार आहे. उदा. अहमदाबाद-बैरानी असं तकिट तुम्ही काढलंत, आणि त्या एक्सप्रेसचं नाव समजा गीतांजली एक्सप्रेस असेल तर त्यातच गीतांजली एक्सप्रेसचं बैरानी-अहमदाबाद तिकीट तुम्हाला काढावं लागणार आहे. तरच तुम्हाला ही सवलत मिळू शकेल.
२. तिकिटावरचे डिटेल्स सारखे असावेत
तिकिटावर तुम्ही जे डिटेल्स देणार आहात, त्यात नाव, वय, क्लास(एसी, स्लीपर), गावातील अंतर हेही सारखंच असण्याची अट या सवलतीसाठी ठेवण्यात आली आहे. म्हणजे एकाच वेळी डिटेल्स भरुन तुम्ही जाण्याचं आणि येण्याचं अशी दोन्ही तिकिटं बुक करु शकणार आहात.
14 ऑगस्ट पासून हे बुकिंग करु शकाल
सध्या रेल्वे हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर करते आहे. या सवलतीचा फायदा 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर पर्यंत जाणाऱ्या तिकिटांसाठी आणि परतीसाठी 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या काळात तिकिटं काढणाऱ्यांना मिळणार आहे. हे बुकिंग 14 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
या ट्रेनना ही सुविधा नाही
ही सूट ज्या रेल्वे, एक्सप्रेस या डायनामिक मानल्या जातात त्यांना मिळणार नाही. उदा. शताब्दी, राजधानी, दुरांतो, सुविधा एक्सप्रेस, वंदे भारत, तेजस एक्सप्रेस या रेल्वेंना ही सवलत लागू असणार नाही. या व्यतिरिक्तच्या इतर श्रेणींच्या रेल्वे आणि मागणीनुसार चालवण्यात येणाऱ्या ट्रेन्सना ही सवलत लागू असणार आहे.





