देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोची विमानसेवा गुरुवारी आज देखील विस्कळीत राहिली. मागील काही दिवसांमध्ये दिल्ली, मुंबई, बंगळूरु आणि अन्य विमानतळांवरून 1400 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे रद्द झाली आली. विमानतळावरील कामकाजात अडथळे येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले असून सलग चार दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये इंडिगोच्या हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. राजधानी दिल्लीत देखील आज इंडिगोच्या विमानसेवेचे वेळापत्रक कोलमडलेले आहे. त्यामुळे प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
दिल्लीतील इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द
इंडिगो एअरलाईनमुळे पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची कालपासून मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत असून इंडिगो विमानांचे बुकींग असलेल्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. कारण, पुणे आणि दिल्ली येथून इंडिगो विमान कंपनीने तब्बल 200 उड्डाणे रद्द केली असून आता अधिकृत पत्र देखील जारी केले आहे. दिल्ली विमानतळ येथून 5 डिसेंबर 2025 रोजी निघणाऱ्या इंडिगोचे सर्व देशांतर्गत उड्डाणे रात्री 11:59 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती इंडिगोकडून अधिकारिकरित्या देण्यात आली आहे. या पत्रात प्रवाशांना झालेल्या मनस्थापाबद्दल इंडिगोकडून माफीनामा देखील सादर करण्यात आला आहे.

दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी (DEL) निघणाऱ्या सर्व इंडिगो देशांतर्गत विमानांची उड्डाणे रात्री 11.59 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. या अनपेक्षित निर्णयाचा गंभीर फटका बसलेल्या आमच्या सर्व मौल्यवान प्रवासी, ग्राहकांची आणि भागधारकांची आम्ही मनापासून माफी मागतो, असे इंडिगोने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
प्रवाशांना सहकार्याचे आवाहन
इंडिगो विमानाचे बुकींग असलेल्या आमच्या सर्व प्रवाशांना आम्ही त्यांना अल्पोपहार, त्यांच्या पसंतीनुसार पुढील उपलब्ध उड्डाण पर्याय, हॉटेल निवास, त्यांचे सामान परत मिळविण्यात मदत आणि लागू असल्यास पूर्ण परतफेड देत आहोत. तसेच, दिल्लीहून आज उड्डाण करणाऱ्या सर्व प्रवाशांना सामान संकलनाबाबत मार्गदर्शनासाठी दिल्ली विमानतळावरील आमच्या ग्राउंड स्टाफशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे. सर्व प्रवासी आमच्या वेबसाइटला https://www.goindigo.in/refund.html भेट देऊ शकतात किंवा मदतीसाठी आमच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधू शकतात. प्रवाशांना होणारी मोठी गैरसोय आणि त्रास आम्हाला समजत आहे, गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत, असे इंडिगोच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
इंडिगोचं नेमकं काय बिघडलं ?
गुरुवारी रात्रीपर्यंत इंडिगोची 1400 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली होती. दिल्ली विमानतळावर सर्वाधिक 95 आणि त्याखालोखाल मुंबईतून 100 हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द करावे लागले. हैदराबादमध्ये 80 हून अधिक आणि बंगळूरुमध्ये 60 हून अधिक विमाने रद्द झाली. त्याशिवाय अन्य विमानतळांवरही उड्डाणे रद्द झाल्यामुळे सर्वत्र प्रवाशांची गर्दी, गोंधळ आणि मनस्ताप असे चित्र दिसले. इंडिगोचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आणि वेळापत्रक सावरण्यासाठी आम्ही काम करत आहोत, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पीटर एल्बर्स यांनी गुरुवारी दिली. मात्र हे लक्ष्य सोपे नाही, असे त्यांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात नमूद केले. प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे वचन पूर्ण करू शकलो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
नव्या नियमांमुळे इंडिगो एअरलाइन्सला मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत असून त्याचा फटका विमान प्रवाश्यांना बसला आहे. वैमानिकांना आवश्यक तेवढा आराम देणं बंधनकारक करण्यात आल्याने अनेक विमानांनी उड्डाण घेतलेलं नाही. याच कारणाने इंडिगोची अनेक विमान आणि हजारो प्रवासी विमानतळांवरच अडकून पडली आहे.