MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

तेलंगणात माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा राजीनामा; बीआरएस पक्षाला सोडचिठ्ठी, के.कवितासोबत नेमकं काय घडलं?

Written by:Rohit Shinde
Published:
दक्षिणेतील तेलंगणाच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. के. कविता यांनी आज विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना कविता यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे खुलासे केले आहेत.
तेलंगणात माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा राजीनामा; बीआरएस पक्षाला सोडचिठ्ठी, के.कवितासोबत नेमकं काय घडलं?

दक्षिणेतील तेलंगणाच्या राजकारणात खरंतर गेल्या काही दिवसांत अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. तेलंगाणााचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांची कन्या के कविता यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या कारवाईनंतर के. कविता यांनी आज विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना कविता यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे खुलासे केले आहेत. त्यामुळे दक्षिणेच्या राजकारणात या घटनेची चांगलीच चर्चा सुरू आहे.

के.कवितांचे खळबळजनक खुलासे

कविता पुढे म्हणाल्या, पक्षात माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं गेलं. खोटानाटा प्रचार प्रसार करण्यात आला. पक्षाच्या कार्यालयातून होणाऱ्या कारवाया आणि खोट्या प्रचाराला आळा घालण्यासाठी मी सांगितलं होतं. परंतु, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव (केटीआर) यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या या वर्तणुकीमुळे पक्षात काय स्थिती आहे याची माहिती माझ्या लक्षात आली, असे कविता यांनी स्पष्ट केले.

आता महिलांनी पुढे येऊन नेतृत्व करायला हवं. जे लोक पक्षाचा वापर स्वतःचा स्वार्थ आणि फायद्यासाठी करू इच्छित आहेत त्यांच्याकडूनच आमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विविध डावपेच खेळले जात आहेत. पक्षातील या षडयंत्रांना बळी पडू नका असे आवाहन कविता यांनी वडील के. चंद्रशेखर राव यांना केले होते. कविता यांनी चुलतभाऊ हरिश राव आणि मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. ज्यावेळी दोघे हैद्राबाद येथून दिल्लीला गेले त्यावेळी हरिश राव रेड्डींच्या पाया पडले आणि माझ्याविरोधआत षडयंत्र केले गेले हे खरे नाही का असा सवाल कविता यांनी विचारला. आता दोघांनीही या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे असेही कविता यांनी सांगितले.

केसीआर यांचा पक्ष आणि कुटुंबात फूट

कालेश्वर प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचारात हरिश राव सहभागी आहेत असा आरोप कविता यांनी केला. त्यांच्याकडून समस्यांचं समाधान होऊ शकत नाही. हरिशकडे इतका पैसा कुठून आला? आमदार खरेदी करून आपल्या ताब्यात ठेवण्याची रणनिती त्यांनी आखली नव्हती का? 2009 मध्ये रमन्ना यांना पाडण्यासाठी त्यांनी 60 लाख रुपये पाठवले नव्हते का? केसीआर यांच्या कुटुंबाला कमकुवत करून फूट पाडण्यासाठी कटकारस्थान रचले या गोष्टी खऱ्या नाहीत का? असे सवाल कविता यांनी विचारले. त्यामुळे या घटनेमुळे भविष्यात आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.