बिहार विधानसभेचे निकाल काल लागले. त्यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा दारूण पराभव झाला. त्यानंतर आता लालूंच्या कुटुंबातून मोठी बातमी समोर आली आहे. लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी मी राजकारण आणि कुटुंब दोन्ही सोडण्याचा निर्णय जाहीर करत असल्याचं सांगितलं आहे. रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावरपोस्ट करत ही घोषणा केली.
रोहिणी आचार्यचा अचानक मोठा निर्णय
बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचं पानीपत झालं आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर होता. यंदाच्या निवडणुकीसाठी महागठबंधननं तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केलं. पण त्यांच्या नेतृत्त्वात लढलेल्या राजदला १४३ पैकी केवळ २५ जागा जिंकता आल्या. यानंतर आता पक्षात यादवी माजली आहे. लालू यांच्या कुटुंबात फूट पडली आहे.

लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रतापला आधीच कुटुंबातून हाकललं आहे. तेज प्रताप यांनी विधानसभा निवडणूक लढवली. पण त्यांचा महुआ विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला. यानंतर त्यांनी तेजस्वी यादव यांना लक्ष्य केलं. त्यांनी तेसस्वी यांचा उल्लेख फेलस्वी असा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या नेत्यांवर स्तुतीसुमनं उधळली. त्यानंतर आता लालू प्रसाद यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी मोठा राजकीय धमाका केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत राजकारण सोडण्याची आणि कुटुंबासोबतचे सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे.
रोहिणी आचार्यच्या पोस्टमध्ये नक्की काय ?
रोहिणी आचार्य यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ‘मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंध तोडतेय. संजय यादव आणि रमीझ यांनी मला हे करायला सांगितलं. सगळा दोष मी माझ्यावर घेतेय,’ असं रोहिणी आचार्य यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. रोहिणी यांच्या पोस्टनं बिहारच्या राजकारणात भूकंप झाला आहे.
I’m quitting politics and I’m disowning my family …
This is what Sanjay Yadav and Rameez had asked me to do …nd I’m taking all the blame’s
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) November 15, 2025
लालूंच्या कुटुंबातील कलह चव्हाट्यावर
राजदमधील कुटुंबातील वाद काही नवीन नाहीत. परंतु निवडणुकीतील पराभवानंतरच्या घटनांमध्ये वेगाने होणारी उलथापालथ पक्षाच्या अंतर्गत कमकुवतपणा उघडकीस आणत आहे. लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांनी आधीच पक्ष आणि कुटुंब सोडले आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि आरजेडीविरुद्ध निवडणूक लढवून आपला बंडखोर दृष्टिकोन उघडपणे दाखवला. आता, रोहिणी आचार्य यांच्या निर्णयामुळे लालू कुटुंबाच्या ऐक्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.











