अलिकडच्या काही वर्षांत भारतातील विविध शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे झपाट्याने विस्तारले आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई, नागपूर यांसारख्या महानगरांबरोबरच आता टियर-२ शहरांमध्येही मेट्रो प्रकल्प राबवले जात आहेत. मेट्रोच्या वाढत्या जाळ्यामुळे प्रवाशांना सुरक्षित, वेगवान आणि वेळेत पोहोचणारी वाहतूक सुविधा मिळत आहे. गर्दीच्या वेळी रस्त्यावरील वाहतुकीतील कोंडी टाळण्यासाठी मेट्रो हा उत्तम पर्याय ठरत आहे.
सरकारकडून मेट्रो प्रकल्पांना गती
सरकारने शहरी वाहतुकीला गती देण्यासाठी आणि शाश्वत वाहतूक उपाय शोधण्यासाठी अनेक परिवर्तनकारी उपक्रम सुरू केले आहेत. मेट्रो प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आले आहेत. यामागे सरकारची दूरदर्शी धोरणे, गुंतवणूक दिसून येते. सरकार स्वच्छ, जलद आणि अधिक कनेक्टेड शहरी भविष्याचा पाया रचत असल्याचे समोर येत आहे.
देशातील मेट्रोचे जाळे विस्तारले!
2000 च्या दशकाच्या सुरुवातीला दिल्ली आणि काही मोजक्या शहरांमध्ये मेट्रोची सुरुवात झाली होती. आता हे मेट्रो जाळे 20 पेक्षा जास्त शहरांमध्ये पसरले आहे. मेट्रोचा हा विस्तार शहरी जागृतीचे एक प्रतीक आहे. मेट्रोमुळे प्रवास वेगवान व सुखरूप झाला आहे. मेट्रो आता केवळ वाहतुकीचे साधन राहिलेले नाही; ती भारताच्या विकासाच्या कथेच्या केंद्रस्थानी असलेली जीवनरेखा आहे. भारत आता जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क म्हणून अभिमानाने उभा आहे.
भारतात 2014 पर्यंत 5 शहरांमध्ये केवळ 248 किमी मार्गावर मेट्रो धावत होती, मात्र 2025 मध्ये शहरांची संख्या 23 वर पोहोचली आहे. सध्या भारतात 1013 किमी मेट्रो मार्ग आहे. केवळ 11 वर्षांत 763 किमी मेट्रो मार्ग वाढला आहे. सरासरी दैनिक प्रवासी संख्या 28 लाख (2014 ) वरून 1.12 कोटींहून अधिक झाली आहे. 2014 पूर्वी एका महिन्यात 0.68 किमी मार्गाचे काम केले जात होते. मात्र आज महिन्यात 6 किमी मेट्रो मार्ग उभारला जात आहे.
प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध
प्रवाशांच्या सोयीसाठी वातानुकूलित डबे, स्वच्छ प्लॅटफॉर्म, डिजिटल तिकीट व्यवस्था आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे. मेट्रोच्या माध्यमातून प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होत असल्याने कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिक वर्गाला मोठा फायदा होतो. तसेच, रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या कमी झाल्याने प्रदूषणातही घट होत आहे.
सरकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या धोरणामुळे मेट्रो प्रकल्पांना गती मिळाली आहे. अनेक शहरांमध्ये नवीन मेट्रो मार्गांची बांधकामे सुरू आहेत, तर काही ठिकाणी विद्यमान मार्गांचे विस्ताराचे काम सुरू आहे. पुढील काही वर्षांत हे जाळे आणखी विस्तारित होऊन बहुतेक मोठ्या आणि मध्यम शहरांना मेट्रो सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देशातील शहरी वाहतुकीत क्रांतिकारी बदल होईल आणि प्रवाशांच्या दैनंदिन जीवनात सोयी, सुरक्षितता आणि वेळेची बचत मोठ्या प्रमाणात होईल.





