नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात ईशान्य भारताच्या विकासात आणखी एक नवी क्रांती घडलीय. भारताच्या ईशान्येकडील मिझोरामची राजधानी आयझॉल ही भारतीय रेल्वेच्या नकाशावर आलीय.
बैराबी ते सैरांग या रेल्वेमार्गाचं काम पूर्ण झालंय. आणि आयझॉल आता रेल्वेने जोडलं गेलंय. मुख्य म्हणजे, जिथे रस्ते उभारणंही कठीण होतं, तिथे रेल्वे पोहोचवण्याचं स्वप्न मोदी सरकारच्या काळात प्रत्यक्षात घडलंय.
ऑयझॉल नदीवर 144 मीटरचा पूल
मिझोरम हे एक विलक्षण सुंदर ठिकाण आहे. हिरव्यागार जंगलांनी व्यापलेले, मिझोरममधील पर्यटन हे कड्यांमधून दिसणारे चित्तथरारक दृश्ये, आश्चर्यकारक धबधबे, या ठिकाणी आहेत. कुतुबमिनारपेक्षाही उंच असा आयझॉल नदीच्या खोऱ्यात 114 मीटर उंचीचा पूल बांधण्यात आला आहे. सैरांग स्थानकाला जोडणारा पुल क्रमांक 196 हा या रेल्वे मार्गातील एक वैशिष्ट्य असून, या पुलाचा पिलर क्रमांक पी-4 ची उंची कुतुबमिनारहून अधिक आहे. हा प्रकल्पातील सर्वात उंच पिलर आहे.
सप्टेंबरमध्ये होणार लोकार्पण
ईशान्य भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचा एक भाग असलेला बैराबी ते सैरांग रेल्वे प्रकल्प पूर्ण झाला असून, सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गामुळं मिझोरामला राजधानी आयझॉलपर्यंत अखंड रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. 1 मे २०२५ रोजी झालेल्या यशस्वी चाचणीनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी दिली आहे.
आसामशी होणार थेट संपर्क
मिझोराममध्ये रेल्वे ट्रॅक फक्त बैराबी शहरापर्यंत होता, जिथून पुढे जाण्यासाठी रस्त्याने जावे लागत असे. जास्त वेळ लागत असेच नाही तर खराब हवामानात भूस्खलनाच्या समस्या येत होत्या, ज्यामुळे रस्ते बंद होत होते. आता, या नवीन रेल्वे ट्रॅकच्या बांधकामामुळे, आसाम, गुवाहाटी सारख्या राज्यांचा मिझोरामची राजधानी ऐझॉलशी थेट संपर्क होणार आहे.
या प्रकल्पात एकूण 55 मोठे पूल आणि 87 लहान पूल आहेत. सैरांग स्थानकाला जोडणारा पुल क्रमांक 196 हा या रेल्वे मार्गातील एक वैशिष्ट्य असून, या पुलाचा पिलर क्रमांक 4 ची उंची कुतुब मिनारहून अधिक आहे. या प्रकल्पात 5 रोड ओव्हर ब्रिज आणि 6 रोड अंडर ब्रिजचाही समावेश आहे. या रेल्वे मार्गात एकूण 48 भुयारी मार्ग असून, त्यांची एकूण लांबी 12 हजार 853 मीटर आहे.
मिझोरम राज्यातील बैराबी ते सैरांग अशी 51.38 किमीची नवीन रेल्वे लाईन पूर्ण झाली असून, बैराबी ते सैरांग दरम्यान होरतोकी, कौनपुई, मुआलखांग अशी तीन रेल्वे स्टेशन उभारण्यात आली आहेत. सप्टेंबर महिन्यात या मार्गाचं लोकार्पण झाल्यानंतर, मिझोरमच्या लोकांसाठी दळणवळण आणि व्यापाराच्या दृष्टीनं एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे.





