Navjot kaur Kaur : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 500 कोटी? सिद्धू यांच्या आरोपाचे खळबळ

Asavari Khedekar Burumbadkar

Navjot kaur Sidhu : काँग्रेस नेत्या नवजोत कौर सिद्धू यांच्या वक्तव्यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठा वाद सुरू झाला आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी 500 कोटी रुपयांची गरज असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने विरोधकांसह स्वतःच्या पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. नवजोत कौर यांनी असेही सांगितले की, जर काँग्रेसने त्यांना पंजाबसाठी मुख्यमंत्रीपदाचे चेहरा म्हणून घोषित केले तर नवजोत सिंह सिद्धू सक्रिय राजकारणात परत येतील. 2027 च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेलेल्या या वक्तव्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत.

500 कोटी कुठून आले? Navjot kaur Sidhu

या विधानावर प्रतिक्रिया देताना पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे राज्य महासचिव बलतेज पन्नू यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की नवजोत कौर सिद्धूंनी (Navjot kaur Sidhu) काँग्रेसची कार्यपद्धती, नेतृत्व ठरवण्याची पद्धत आणि पैशांच्या व्यवहारातून सत्ता मिळवण्याचे वास्तव उघड केले आहे. पन्नूंनी प्रश्न उपस्थित केला की जर सिद्धू दांपत्याकडे 500 कोटी नाहीत, तर ही रक्कम नेमकी कोण देतो आणि कोणापर्यंत पोहोचते, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे.

भाजपचा काँग्रेसवर निशाणा

भाजपनेही या प्रकरणावर काँग्रेसला घेरले. भाजपचे पंजाब अध्यक्ष सुनील जाखड यांनी दावा केला की काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी विविध मापदंड आहेत आणि यापूर्वी 350 कोटींचाही उल्लेख झाल्याचे त्यांनी ऐकले आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांनी म्हटले की नवजोत कौर सिद्धूंनी केलेले विधान हे काँग्रेसमध्ये पैशांच्या जोरावर सत्ता विकत घेण्याचे वास्तव दर्शवते. हे पक्षाच्या नैतिक अध:पतनाचे स्पष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, काँग्रेसच्या गोटातूनही सिद्धू कुटुंबावर टीका झाली. गुरदासपूरचे काँग्रेस खासदार सुखजिंदर सिंह रंधावा यांनी म्हटले की सिद्धू कुटुंब काँग्रेसमध्ये ज्या उद्देशाने आले होते, तो उद्देश पूर्ण झाला आहे. सिद्धूंना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष पद कसे मिळाले, याचा खुलासा त्यांनी करायला हवा. रंधावांनी असा आरोप केला की नवजोत सिद्धूंनी अनेकदा विरोधकांनी तयार केलेली स्क्रिप्ट वाचल्यामुळे काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागले. या संपूर्ण वादामुळे पंजाब काँग्रेसमध्ये चिंता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नवजोत कौर यांच्या 500 कोटींच्या विधानावर काँग्रेसकडून अधिकृत उत्तराची प्रतीक्षा आहे.

ताज्या बातम्या