बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादन केला आहे. आकडेवारीनुसार, एनडीए १९७ जागांवर आघाडीवर असून, महाआघाडी अवघ्या ३६ जागांवर सिमटली आहे. भाजप ९१ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर जेडीयू ८१ जागांवर आघाडीवर आहे. आरजेडीला मोठा धक्का बसला असून, १४३ जागा लढवूनही त्यांना केवळ २७ जागांवर आघाडी घेता आली. काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.
NDAच्या विजयात लाडक्या बहिणींची भूमिका
‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना 2025’ ही योजना बिहार विधानसभा निवडणुकीत NDA साठी मास्टरस्ट्रोक ठरली. बिहारमधील ग्रामीण व शहरी महिलांना स्वावलंबी बनवणे, हा या योजनाचा मूळ उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सुरुवातीला प्रत्येक पात्र महिलेला 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. पुढे जाऊन महिलांना 2 लाखांपर्यंतचे अतिरिक्त अर्थ सहाय्य देण्याची तरतूद आहे, जेणेकरून त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.

2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी मतदानाचा नवा इतिहास रचला आहे. महिलांनी बिहारच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा रेकॉर्डब्रेक 71.61 टक्के मतदान केले. ते गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 10 टक्क्यांहून जास्त आहे. सन 2020 मध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी 59.69 टक्के होती.
मायक्रो प्लॅनिंग आणि निवडणुकीपूर्वी १ कोटी ३० लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये जमा करण्याची योजना महत्त्वपूर्ण ठरली. विकास आणि जातीय समीकरणावर विकासाचा नारा भारी पडल्याचे म्हटले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बंडखोरांना शांत करण्यात आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सूक्ष्म नियोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
महागठबंधन, पीकेंना पराभवाचा मोठा धक्का!
महागठबंधनला सध्या फक्त 35 जागांवर आघाडी मिळाल्याचे चित्र बिहारमध्ये पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधींसह तेजस्वी यादव यांच्यासाठी देखील हा एक मोठा धक्का मानला जात आहे. संध्याकाळी अंतिम कल येतील, मात्र महागठबंधनला बिहारमध्ये जबरदस्त पराभवाचा झटका बसला आहे.
सद्यस्थितीनुसार, बिहार निवडणुकीत जन सुराजला एकही जागा न मिळाल्याने प्रशांत किशोर जे देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतीकार समजले जातात त्यांच्या राजकीय प्रवासाला पहिल्याच क्षणी तगडा झटका बसला आहे. निवडणुकांपूर्वी तीन वर्षांचा कष्टसाध्य प्रवास, हजारो किलोमीटरची पदयात्रा, डिजिटल माध्यमांवरील प्रचंड लोकप्रियता आणि ‘बिहार बदलण्यासाठी तिसरा पर्याय’ उभा करण्याचा दावा या सर्व गोंगाटानंतरही निकालाने PK यांची निराशा झाली आहे.











