CM Nitish Kumar: नितीश कुमार दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधानांच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न

Rohit Shinde

बिहारमधून मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. पाटणा येथील प्रसिद्ध गांधी मैदानात गुरुवारी, 20 नोव्हेंबर 2025 नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार हे दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी उपस्थित होते. याशिवाय, एनडीए शासित इतर राज्यांच्या मुख्यमंत्री आणि अनेक राजकीय नेतेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

नितीश कुमार दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळालं असून 243 जागांपैकी 202 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने येथील निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, भाजप सर्वाधिक जागा जिंकत येथे मोठा भाऊ बनल्याचं दिसून आलं. त्यामुळे, बिहारच्या मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता देशाला होता. अखेर, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी 10 वेळा शपथ घेऊन सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री बनण्याचा नवा विक्रम रचला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात मोठ्या जनसमुदायासमोर हा शपथविधी संपन्न झाला.

भाजप आणि जदयुला निवडणुकीत मोठं यश

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि नितीश कुमार यांच्या जयदूने प्रत्येकी 102 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी, भाजपने 89 तर जदयूने 85 जागांवर विजय मिळवला. तर, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला 19 जागा जिंकता आल्याने 202 जागांसह मोठं बहुमत एनडीए आघाडीला मिळाले. त्यानंतर आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांनी 10 व्यांदा शपथ घेतली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळ येऊन नितीश कुमार यांचे अभिनंदन केले.

बिहारमध्ये जनतेत नितीश कुमारांची क्रेझ कायम

बिहारमध्ये नितीश कुमार यांची जनतेतील क्रेझ अजूनही कायम आहे. अनेक वर्षांच्या प्रशासनात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे, पायाभूत सुविधा उभारणीमुळे आणि कायदा-सुव्यवस्थेत झालेल्या सुधारणांमुळे त्यांच्यावरील लोकांचा विश्वास वाढतच गेला आहे. बदलत्या राजकीय समीकरणांनंतरही नितीश कुमार स्थिर आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागातील विकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत जनता त्यांच्याकडे आशेने पाहते. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे आणि शांत स्वभावामुळे बिहारमधील नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता टिकून आहे.

2022 मध्ये नितीश यांनी पुन्हा एकदा यु-टर्न घेतला, एनडीए सोडून महाआघाडीत सामील झाले आणि सरकार स्थापन केले. यानंतर जानेवारी 2024 मध्ये त्यांनी महाआघाडी सोडली आणि एनडीएमध्ये परतले आणि नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता 2025 च्या बिहार निवडणुकीत एनडीएच्या ऐतिहासिक विजयासह ते 10व्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत. त्यामुळे दुसरीकडे ‘पलटूराम’ अशी देखील नितीश कुमारांची ख्याती आहे.

ताज्या बातम्या