जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्यांनी राजभवन येथे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांच्याकडे राजीनामा सादर केला. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी तो स्वीकारला. नितीश कुमार आता पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर ते 20 नोव्हेंबर रोजी 10 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला देशभरातील अनेक बड्या नेत्यांसह देशाचे पंतप्रधान देखील हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नितीश कुमारांची मुख्यमंत्री होण्याची 10 वी वेळ
बिहारमध्ये एनडीएने विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर नीतीश कुमार विक्रमी १० व्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. २० नोव्हेंबर रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विधिमंडळ पक्षाचे नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांचे नाव प्रस्तावित केले. याला जेडीयूचे वरिष्ठ नेते बिजेंद्र प्रसाद यादव आणि एलजेपी (रामविलास) प्रदेशाध्यक्ष राजू तिवारी यांच्यासह सर्व आघाडी पक्षांच्या आमदारांनी अनुमोदन दिले. यामुळे नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग औपचारिकपणे मोकळा झाला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सांगितले की, गुरुवारी शपथविधी समारंभ होणार आहे ज्यामध्ये 75 वर्षीय नितीश कुमार 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तत्पूर्वी, एनडीएतील प्रमुख घटक पक्षांनी बुधवारी त्यांच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड केली. जनता दल युनायटेड (जेडीयू) आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
बिहारमध्ये जनतेत नितीश कुमारांची क्रेझ कायम
बिहारमध्ये नितीश कुमार यांची जनतेतील क्रेझ अजूनही कायम आहे. अनेक वर्षांच्या प्रशासनात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे, पायाभूत सुविधा उभारणीमुळे आणि कायदा-सुव्यवस्थेत झालेल्या सुधारणांमुळे त्यांच्यावरील लोकांचा विश्वास वाढतच गेला आहे. बदलत्या राजकीय समीकरणांनंतरही नितीश कुमार स्थिर आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागातील विकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत जनता त्यांच्याकडे आशेने पाहते. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे आणि शांत स्वभावामुळे बिहारमधील नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता टिकून आहे.
2022 मध्ये नितीश यांनी पुन्हा एकदा यु-टर्न घेतला, एनडीए सोडून महाआघाडीत सामील झाले आणि सरकार स्थापन केले. यानंतर जानेवारी 2024 मध्ये त्यांनी महाआघाडी सोडली आणि एनडीएमध्ये परतले आणि नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता 2025 च्या बिहार निवडणुकीत एनडीएच्या ऐतिहासिक विजयासह ते 10व्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत. त्यामुळे दुसरीकडे ‘पलटूराम’ अशी देखील नितीश कुमारांची ख्याती आहे.