श्रीनगर- संपूर्ण देशाला वेदना देणाऱ्या 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा बदला अखेर भारतीय सैन्यानं घेतलाय. या हल्ल्याचा मुख्य आरोपी माास्टरमाईंड हाशिम मुसा याला सैन्यदलानं कंठस्नान घातलंय.
श्रीनगरच्या लिडवास भागात भारतीय सैन्याच्या ऑपरेशन महादेवमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं. त्यात पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार झालाय.

लिडवासमध्ये ऑपरेशन महादेव
हाशिम मुसा याची ओळख पटली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जारी केलेल्या स्केचमध्ये त्याचा समावेश होता. त्याच्यासोबत आदिल हुसैन ठाकूर आणि अली उर्फ तल्हा भाई यांचीही नावं देण्यात आलेली होती.
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले इतर दोन दहशतवादी हे 2024 साली सोनमर्ग सुरुंग प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यातील असल्याचं सांगण्यात येतंय.
या दहशतवाद्यांकडून एके 47च्या 17 रायफल्स, कार्बाईन, ग्रेनेड जप्त करण्यात आलंय. यासोबतच इतरही काही संशयित सामान या एन्काऊंटरमध्ये मिळालं आहे. याची माहिती मंगळवारी सैन्यदल अधिकृतपणे देण्याची शक्यता आहे. सोमवारी जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील लिडवास भागात भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे ही कारवाई केली.
ऑपरेशन महादेव नावामागची कहाणी
तीन दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या या ऑपरेशनला नाव देण्यात आलं होतं ‘ऑपरेशन महादेव!’
श्रीनगरमधील न्यू थीडजवळ ‘महादेव शिखर’ आहे. या परिसराला सामरिक आणि आध्यात्मिक असं प्रचंड महत्त्व आहे. स्थानिक पातळीवर या शिखराला सर्वोच्च धार्मिक महत्व आहे. झबरवान पर्वतरांगेतील प्रमुख शिखर म्हणून त्याकडे पाहिलं जातं. सध्या सुरु असलेल्या श्रावण महिन्यात आध्यात्मिकदृष्ट्या महादेवाला फार महत्त्व आहे. या काही कारणांमुळे या ऑपरेशनला महादेव असं नाव देण्यात आल्याची माहिती आहे.
कोण होता हाशिम मुसा?
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लश्कर ए तोयबाचा दहशतवादी अशी हाशिम मुसाची ओळख आहे. पाकिस्तानी लष्करामध्ये निम लष्करी जवान म्हणूनही तो कार्यरत होता. अशीही माहिती आहे
युद्ध, रणनीती आणि पर्वतीय प्रदेशामधील युद्धाचं त्यानं प्रशिक्षण घेतलं होतं. काश्मीरमधील कठुआ आणि सांबा सेक्टरमधून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. . भारतात आल्यानंतर सर्वात आधी राजौरी-पुंछमधील डेरा परिसरात तो सक्रिय झाला होता. भारतीय लष्कराच्या जवानांवर हल्ले करण्याचा कट रचण्यात त्याचा सहभाग होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. मुसाला मारण्यात आल्यानंतर या कुटुंबातील व्यक्तींनी सामाधान व्यक्त केलंय.











