नवी दिल्ली- दिल्लीतील संसदर भवन परिसरात मंगळवारी एनडीएच्या संसदीय दलाची बैठक पार प़डली. या बैठकीत ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या सफलतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला. संरक्षणमंत्री राजनाथ यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना हार घालण्यात आला. यावेळी खासदारांनी हर हर महादेव आणि भारतमाता की जयची घोषणाबाजीही केली.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागल्याची माहिती आहे. संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी करणं ही विरोधकांची चूक होती, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. यात विरोधकांचीच फजिती झाल्याचं मोदी म्हणाले. विरोधक स्वताच्या पायांवर कुऱ्हाड मारुन घेण्यात माहीर असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
Earlier today, attended a meeting of NDA MPs, in which we had fruitful discussions on aspects relating to good governance and focussing on public welfare. pic.twitter.com/E90OsJOluX
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2025
बिहारच्या मतदार यादी पडताळणीवरही भाष्य
बिहारमध्ये मतदार याद्या पडताळणीला इंडिया आघाडीनं विरोध केला आहे. या प्रकरणी जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. देशातील जनता सगळं बघते आहे, असंही मोदी पुढं म्हणाले. या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचंही कौतुक केलंय. दीर्घकाळ देशसेवा करणारे केंद्रीय गृहमंत्री असं सांगत त्यांनी शाहांचं कौतुक केलं.
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेवर ठराव
एनडीएच्या या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेबाबत एक ठराव मंजूर करण्यात आला. सैन्य शक्ती आणि मजबूत नेतृत्वामुळेच हे शक्य झाल्याचा उल्लेख या ठरावात करण्यात आलेला आहे. भारत दहशतवाद विसरत नाही आणि त्याला माफही करत नाही, असंही या ठरावात नमूद करण्यात आलंय.
एनडीएच्या बैठकीत मोदींकडून खासदारांची भेट
पंतप्रधानांनी या बैठकीत नव्या खासदारांची भेट घेतली. या बैठकीत भाजप आणि मित्रपक्षाचे सर्व खासदार सहभागी झाले होते. यावेळी खासदारांना एनडीएच्या ११ वर्षांच्या कालखंडानिमित्तानं ११ वर्ष, ११ मोठे निर्णय, हे पुस्तक भेट स्वरुपात देण्यात आलं.
२१ जुलैपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनात एनडीएची ही पहिलीच बैठक होती. तर सत्तेत आल्यानंतर जून २०२४ नंतर झालेली दुसरी बैठक होती.





