पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील अटीतटीची लढाई आता दिसते आहे. बिहारच्या दरभंगामध्ये 27 ऑगस्टला झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईवरुन शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर सात दिवसांनी बिहारच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिवीला प्रत्युत्तर दिलंय.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या मंचावरुन आईला शिव्या देण्यात आल्या. या शिव्या केवळ आपल्या आईचा अपमान नव्हे तर देशातील साऱ्या आई-बहिणींचा आणि मुलींचा अपमान आहे.

पंतप्रधान झाले भावूक
काँग्रेसच्या व्यासपीठावरुन पंतप्रधान मोदी यांच्या आईबाबत करण्यात आलेल्या शिवीगाळीच्या मुद्द्यावर बोलताना नरेंद्र मोदी भावूक झालेले पाहायला मिळाले. पंतप्रधान भावूक झालेले पाहून बिहारचे भाजपा अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्याही डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. इतकंच नाही तर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांच्या डोळ्यातही अश्रू दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हीसीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्या संस्थेचा कार्यक्रम होता, त्या संस्थेच्या खात्यात पंतप्रधानांनी 105 कोटींचा निधीही पाठवला.
मोदी नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईवरुन काँग्रेसच्या व्यासपीठावरकुन शिविगाळ करण्यात आल्यानंतर, पंतप्रधानांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केलाय. नरेंद्र मोदी म्हणाले की, या घटनेनं जेवढं दु:ख मला झालं, त्यापेक्षा जास्त त्रास हा बिहारच्या नागरिकांना झाला आहे. मी आयुष्यातील प्रत्येक क्षणी देशासाठी आणि देशवासियांसाठी कष्ट उपसले. यात माझ्या आईची आणि तिच्या आशीर्वादांची मोठी भूमिका होती. मला जन्म देणाऱ्या आईनं जबाबदाऱ्यांतून माझी मुक्तता केली होती. आता माझी आई अस्तित्वात नाही. माझ्या आईचा राजकारणाशी संबंधही नव्हता, मात्र तरीही काँग्रेस आणि आरजेडीच्या मंचावरुन माझ्या आईला शिव्या देण्यात आल्या.
परवा बिहार बंदची हाक
पंतप्रधान मोदी यांच्या आईला शिविगाळ प्रकरणात भाजपा आक्रमक झालेली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी 4 सप्टेंबरला बिहार बंद करण्याची घोषणा भाजपाच्या वतीनं करण्यात आलीय. या बंदमध्ये रस्ते आणि दुकानं बंद राहणार आहेत. भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं हा बंद पुकारण्यात आलेला आहे. एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी या बिहार बंदला पाठिंबा दर्शवला आहे.











