नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या जोडगोळीवर बिहारच्या जनतेने पुन्हा विश्वास दाखवून एनडीएच्या हाती सत्तेची सूत्रे दिली. २४३ जागांपैकी तब्बल २०२ जागी एनडीएचे उमेदवार जिंकले. महागठबंधनला केवळ ३५ जागांवर विजय मिळवता आला. बिहारमध्ये एनडीएला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात भाषण केले. भाषणात त्यांनी राजद आणि काँग्रेसवर सडकून प्रहार केले. शिवाय यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे विशेष आभार मानले.
लोकांनी जंगलराज नाकारलं -मोदी
विजयी सभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” हा विजय ज्यांना विकास नको आहे त्यांच्या विरोधातील आहे. तसंच, येथील जंगलराजला वैतागलेल्या लोकांनी विकासाला दिलेली ही साथ आहे. त्याचबरोबर अनेक वर्ष ज्यांनी देशात आणि राज्यात राज्य केलं त्या लोकांनी बिहारसाठी काही केलं नाही. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला आहे.” यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाहा यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
काँग्रेस फुटणार; पंतप्रधानांचं भाकीत
काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक उद्देश नाही. लोकांच्या सेवेसाठी दूरदृष्टी नाही. त्यामुळे जनतेचा काँग्रेसवरील विश्वास संपला आहे. आजची काँग्रेस लीग ही मुस्लिम माओवादी काँग्रेस अर्थात एमएमसी झाली आहे. संविधानिक संस्थांवर अविश्वास व्यक्त करण्याचा काँग्रेसचा अजेंडा आहे. पक्षनेतृत्वाच्या याच भूमिकेमुळे काँग्रेसमधल्या एका गटात असंतोष असून पक्षाचे तुकडे होऊ शकतात, असे मोठे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विजयानंतर बोलताना केले.
मोदींचा पवार-ठाकरेंना ‘तो’ मेसेज?
बिहारमध्ये काही जणांनी तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी MY अर्थात मुस्लिम-यादव अशा फॉर्म्युल्याची घोषणा दिली. पण एनडीएच्या विजयाने MY अर्थात महिला, यूथ समीकरण अधोरेखित झाले. बिहारच्या जनतेला आता जंगलराज नको तर विकासाचे मंगलराज हवे आहे, असेही मोदी म्हणाले. ज्यांच्यासोबत काँग्रेस असते, त्यांचे मतदार संपविण्याचे काम काँग्रेस करते. आता काँग्रेसच्या मित्रपक्षांनी त्यांच्यापासून सावध व्हावे. आजची काँग्रेस मुस्लिम माओवादी काँग्रेस झालेली आहे, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे संदेश दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.





