पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यातील भाषणातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा देखील केल्या. देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावल्यानंतर पीएम मोदींनी भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यांनी आपल्या देशातील युवकांसाठी मोठी घोषणा केली. आज म्हणजेच 15 ऑगस्टपासून देशात प्रधानमंत्री विकसित भारत योजना लागू झाली आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे तरूण वर्गाला पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
पहिल्या नोकरीनंतर 15 हजार मिळणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मोठ्या घोषणा केल्या. जीएसटीच्या आढाव्यासह त्यांनी आज पीएम विकसित भारत योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पहिली नोकरी मिळाल्यानंतर युवकांना 15 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. आजपासूनच ही योजना देशभरात लागू झाल्याचे मोदी यांनी सांगितले. या योजनेसाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजपासूनच या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
योजनेसाठी काही महत्वाच्या अटी
या योजनेत सरकारने उत्पादन क्षेत्रावर फोकस केला आहे. याचाच विचार करून योजना तयार करण्यात आली आहे. एखाद्या युवकाने पहिल्यांदाच एखाद्या कंपनीत जॉब सुरू केला त्यावेळी त्याला सरकारकडून 15 हजार रुपये दिले जातील. या योजनेत काही अटी देखील आहेत. या अंतर्गत नोकरी मिळवणाऱ्या युवकाला त्या कंपनीत कमीत कमी सहा महिने काम करावे लागेल. यासह संबंधित कंपनी EPFO मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण केल्या जात असतील तरच अनुदान मिळेल.
योजनेचा लाभ नेमका कसा मिळणार?
विशेष म्हणजे या योजनेता लाभ घेण्यासाठी कोणतीही विशेष प्रक्रिया पार पाडावी लागणार नाही. तर तरूणांना थेटपणे योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. तुम्ही एखाद्या कंपनीत रुजू होताल त्यावेळी पीएफ अकाउंट (PF Account) उघडले जाईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र होताल. या योजनेतील पहिला हप्ता सहा महिन्यांनंतर थेट खात्यात जमा करण्यात येईल. त्यामुळे एकंदरीत तरूणांच्या थेट खात्यामध्ये पैसे या निमित्ताने जमा होणार आहेत.





