पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७५ वा वाढदिवस; देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव, कारकिर्दीचा आढावा…

Rohit Shinde

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १७ सप्टेंबर रोजी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यापासून 11 वर्षांत पक्षालाच नव्हे तर, देशाच्या अर्थव्यवस्थेलादेखील एका नव्या उंचीवर नेले आहे. गेल्या 11 वर्षात मोदी सरकराने असंख्य योजना राबवल्या, ज्याचा परिणाम सामान्य लोकांना आणि संपूर्ण व्यवस्थेला जाणवला. बँकिंगपासून आरोग्यसेवेपर्यंत, घरबांधणीपासून रोजगारापर्यंत आणि डिजिटल इंडियापासून रेल्वेपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात व्यापक काम करण्यात आले. मोदींच्या एकूणच कारकिर्दीबद्दल जाणून घेऊ…

पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजकीय कारकिर्द

पंतप्रधान श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील वडनगर येथे एका सामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना मेहनत, संघटन व सामाजिक कार्याची आवड होती. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रचारक म्हणून काम करताना संघटनशक्ती, वक्तृत्व आणि लोकसंपर्काची कला आत्मसात केली. पुढे भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षाचे संघटन बळकट करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. २००१ मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि २०१४ पर्यंत राज्याचे नेतृत्व केले. या काळात त्यांनी औद्योगिक विकास, गुंतवणूक आकर्षित करणे, पायाभूत सुविधा उभारणे आणि प्रशासनात कार्यक्षमता आणणे यावर भर दिला.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांनी “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या ब्रीदवाक्याखाली कार्य करत मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारखे विकासकेंद्री उपक्रम सुरू केले. सर्वसामान्य जनतेसाठी जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, स्वच्छ भारत अभियान यांसारख्या योजनांचा लाभ पोहोचवला. आर्थिक क्षेत्रात नोटाबंदी, वस्तू व सेवा कर (GST) लागू करणे यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेतले.

२०१९, २०२४ मध्ये पुन्हा एनडीएचे सरकार निवडून आल्यावर त्यांनी आत्मनिर्भर भारत, पीएम किसान योजना, जल जीवन मिशन, तसेच कोविड-१९ काळातील लसीकरण आणि मदतकार्य या उपक्रमांवर भर दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोदींनी भारताची प्रतिमा अधिक उंचावली आणि विविध देशांशी दृढ संबंध प्रस्थापित केले. एकंदरीत नरेंद्र मोदींची कारकीर्द म्हणजे साधेपणातून उभारलेले नेतृत्व, कठोर निर्णयक्षमतेने चालवलेली प्रशासनशैली आणि विकासकेंद्री दृष्टिकोन असे म्हटले जाते. अलीकडच्या काळात दहशतवादाला दिलेले चोख प्रत्युतर अवघ्या जगाने पाहिले.

पीएम मोदींच्या काळातील काही लक्षवेधी कामे

  • मोदी सरकारने जन धन योजना सुरू केली. प्रत्येक गरीब कुटुंबाला बँकिंग सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 50 ​​कोटींहून अधिक लोकांसाठी बँक खाती उघडण्यात आली.
  • 2014 मध्ये सुरू झालेले स्वच्छ भारत अभियान केवळ एक योजना न राहता एक जनआंदोलन बनले. खेड्यांपासून ते शहरांपर्यंत करोडो देशवासी या मोहिमेत सहभागी झाले.
  • आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत, 50 ​​कोटींहून अधिक लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्यात आले आहेत.
  • भारताची गुंतागुंतीची करप्रणाली सोपी करण्यासाठी 2017 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला.  त्यानंतर अलीकडेच यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या.
  • मोदी सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 4 कोटींहून अधिक घरे बांधण्यात आली. या योजनेचे उद्दिष्ट गरीब, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देणे हे होते.
  • 2015 मध्ये सुरू झालेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाने देशाला डिजिटल युगात प्रवेश दिला. इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवली गेली, ऑनलाइन सेवा सोप्या झाल्या आणि डिजिटल साक्षरतेला चालना देण्यात आली.

अनेक दूरगामी बदल नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या काळात देशामध्ये झाले. नोटबंदी, कोव्हिड 19 या मुद्द्यावर मोठा विरोधही त्यांना सहन करावा लागला.

ताज्या बातम्या