श्रेयस अय्यर ICU मध्ये; शेवटच्या वनडेतील दुखापतीनंतर उपचार सुरू, गंभीर इजा झाल्याची चर्चा

ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या वनडेत फिल्डिंगदरम्यान संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर श्रेयस अय्यर पुन्हा मैदानात आलाच नाही. आता त्याला आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला बरगडीला दुखापत झाली होती. सध्या श्रेयस अय्यरला सिडनीच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. बरगडीच्या दुखापतीमुळे अजूनही अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी श्रेयस अय्यरला भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत चांगली कामगिरी केली. तथापि, श्रेयस अय्यरची सध्याची प्रकृती पाहता पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.

श्रेयस अय्यरवर आयसीयुत उपचार सुरू

दुखापतीमुळे श्रेयस अय्यरची वाईट अवस्था होती. मैदानावरच तो पोट आणि छातीचा भाग पकडून वेदनेने विव्हळताना दिसलेला. त्यानंतर मेडिकल टीम त्याला मैदानाबाहेर घेऊन गेली. आता त्याच्या इंजरीची गंभीरता लक्षात घेऊन सिडनीच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे. टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीज खेळणार आहे. श्रेयस अय्यर या टीमचा भाग नाहीय. मात्र, तरीही दुखपतीची गंभीरता लक्षात घेऊन उपचारासाठी मॅनेजमेंटने त्याला तिथे थांबवलय. रिपोर्ट्नुसार, श्रेयसला ICU मध्ये ठेवलय. अय्यरला जवळपास आठवडाभर इथे रहावं लागू शकतं.

श्रेयस अय्यर पुन्हा मैदानात कधी दिसणार?

श्रेयस अय्यर मैदानावर कधी परतणार असा सवाल क्रिकेटप्रेमींकडून विचारला जातोय. श्रेयस अय्यर 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे साऊथ आफ्रिकेतील सिरीजमध्ये श्रेयस अय्यर पुन्हा मैदानात दिसतो का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र त्याच्या रिकव्हरीसाठी बराच कालावधी लागेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News