Nepal News : हा तरुण आहे नेपाळच्या आंदोलनामागचा चेहरा! कोण आहे सुदान गुरुंग, नेमकं काय केलं?

Smita Gangurde

Who is Sudan Gurung : भारताच्या शेजारच्या हिमालय पर्वतरागांमध्ये वसलेला देश म्हणजे नेपाळ. पण सध्या मात्र नेपाळ धगधगतंय. कारण नेपाळमधल्या तरुणाईच्या संतापाचा स्फोट झालाय. रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलनं केली जातायत. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब अशा सोशल मिडीयावरील बंदी तसंच सरकारच्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी ही जेन झी क्रांती नेपाळच्या रस्त्यावर घडतेय.

एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेल्या या तरुणांच्या गर्दीमागे एक चेहरा आहे, तो म्हणजे सुदान गुरुंग… सरकारविरोधात तरुणांमध्ये असलेल्या असंतोषाचं रुपांतर गुरुंगनं रस्त्यावरच्या आंदोलनात करून दाखवलंय.

जेन झी क्रांतीमागचा चेहरा सुदान गुरुंग

36 वर्षांचा सुदान गुरुंग हा हामी नेपाल नावाच्या स्वयंसेवी संस्थेचा संस्थापक आहे.
सुदाननं ‘हाऊ टू प्रोटेस्ट’ असे व्हिडीओ पोस्ट केले. नेपाळमध्ये 8 सप्टेंबरला आंदोलन करण्याचं आवाहन त्यानं इन्स्टाग्रामवरून केलं
शालेय गणवेशात पुस्तकं घेऊन आंदोलन करण्याचं आवाहन त्यानं केलं, घराणेशाही जोपासणारे नेते आणि श्रीमंत हे सुदान गुरुंगच्या टार्गेटवर होते
सुदान यांच्या सांगण्यावरून शेकडो तरूण- तरूणी रस्त्यावर उतरलेत. आणि ही तरुण पिढी जेन- झी म्हणून ओळखली जातेय.

जेन झेड म्हणजे काय?

  • जेन- झी म्हणजे जनरेशन झेड. 1997 ते 2012 या काळात जन्माला आलेली पिढी
  • इंटरनेट, डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्टफोनच्या युगात जन्मलेली, वाढलेली ही पिढी
  • तांत्रिकदृष्ट्या साक्षर आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेली पिढी

नेपाळच्या तरुणाईनं केला सत्तापालट

नेपाळमधील शिक्षक भरती घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर सुदान यांचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं. भरती प्रक्रियेत पैशाच्या आणि राजकीय संबंधांच्या आधारे नियुक्त्या केल्याचा आरोप गुरुंग यांनी केला. आणि या आरोपांनंतर त्यांच्यावर कथित हल्लादेखील करण्यात आला होता. हेच सुदान पुन्हा एकदा सरकार विरोधात उभे ठाकलेत. पण यावेळी सगळ्या नेपाळची तरुणाई त्यांच्यासोबत आहे. जेन झीची ही क्रांती नेपाळला कुठं घेऊन जाते, ते पाहायचं.

ताज्या बातम्या