बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासह महागठबंधन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, अशी शक्यता आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांच्या नावास सर्व पक्षांची सहमती आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महागठबंधनमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. महागठबंधनमधील सर्व राजकीय पक्षांमधील मतभेद दूर् करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासह आणि जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.
तेजस्वी यादव महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ?
महागठबंधनच्या सर्व पक्षांनी मिळून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांचं नाव जाहीर केलं पाहिजे, असं म्हटलं जात आहे. ऐन निवडणुकीच्या काळात तेजस्वी यादव यांच्या नावासह प्रचार केल्यास त्याचा अधिकचा फायदा होईल, असे जाणकारांचे मत आहे. बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार आहे. 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर या दोन दिवशी मतदान होणार आहे. तर, 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. बिहारमध्ये एनडीए आणि महागठबंधन आमने सामने येणार आहेत.
बिहारमध्ये घोषणांचा पाऊस, आश्वासनांची पूर्ती होणार?
बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर एकामागून एक राजकीय घोषणा सुरू झाल्या आहेत. बिहारमधील एनडीए सरकारने 75 लाख महिलांच्या बँक खात्यावर दहा हजार रुपये वर्ग केले आहेत. या योजनेला मुख्यमंत्री महिला रोजगार योजना असे नाव दिले आहे. योजनेमुळे एनडीएकडे महिला व्होट बँक आकर्षित होणार आहेत. परंतु या योजनेला काउंटर करणारी मोठी घोषणा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी गुरुवारी केली आहे.
इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाईल. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर वीस दिवसांमध्ये असा कायदा केला जाईल, अशी घोषणा तेजस्वी यादवने केली आहे. त्यामुळे तेजस्वी यादवांची ही घोषणा देखील चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, बिहारमध्ये आता रोजगाराचे पुनरुज्जीवन होईल. राज्यातील ज्या कुटुंबाकडे सरकारी नोकरी नाही अशा प्रत्येक कुटुंबाला नवीन कायदा करून सक्तीची नोकरी दिली जाईल. सरकार स्थापन होताच वीस दिवसांच्या आत कायदा लागू करू. त्यानंतर वीस महिन्यांच्या आत, बिहारमध्ये असे एकही घर राहणार नाही ज्याला सरकारी नोकरी नसेल, या घोषणेची चर्चा सुरू आहे.





