तामिळनाडूतील शिवगंगा येथे 2 बसेसचा भीषण अपघात; 11 प्रवाशांनी जीव गमावला !

Rohit Shinde

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात रविवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात अकरा जणांचा मृत्यू झालाय. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. शिवगंगा जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) शिवा प्रसाद यांनी सांगितलं की, तिरुपत्तूरजवळ दोन बसेस समोरासमोर आदळल्यानं हा अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. अपघातानंतर स्थानिकांनी मदतकार्य करत अनेकांचे जीव वाचवले. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन बसेसमध्ये झालेल्या धडकेत अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

अपघात नेमका कधी अन् कसा झाला ?

रविवारी तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील तिरुपथूरजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला, ज्यामध्ये दोन बसेसची समोरासमोर टक्कर झाली. यामध्ये एका मुलासह 11जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शिवगंगा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक शिवा प्रसाद यांनी या घटनेची पुष्टी केली. पोलिसांनी सांगितले की, एक बस कराईकुडीला आणि दुसरी मदुराईला जात असताना तिरुपथूरजवळ त्यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेमुळे अनेक प्रवासी वाहनांमध्ये अडकले आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात आले.

हा अपघात कराईकुडीपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर झाला. सर्व 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये आठ महिला, दोन पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे. 20 हून अधिक जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत घोषित

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे प्रभारी मंत्री केआर पेरियाकारुपन यांना प्रभावित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाख रुपये आणि गंभीर जखमींना १ लाख रुपये भरपाई जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी किरकोळ जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणाही केली. या परिसरात तत्पूर्वी, 24 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात दोन बसेसची समोरासमोर टक्कर झाली होती. यामध्ये सात प्रवासी ठार झाले होते आणि 50 हून अधिक जण जखमी झाले होते. मदुराई-कोल्लम राष्ट्रीय महामार्गावरील कडायनल्लूरजवळ हा अपघात झाला होता.

ताज्या बातम्या