MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

पुरीच्या जगन्नाथ मंदिराला दहशतवादी हल्ल्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

पुरीच्या जगन्नाथ मंदिराला दहशतवादी हल्ल्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

पुरी येथील जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही धमकी ओडिया भाषेत माँ बुधी ठाकुरानी मंदिराच्या भिंतीवर लिहिण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

भिंतीवर लिहिली होती धमकी

एका भिंतीवर लिहिलेल्या धमकीमध्ये म्हटलं होतं की, “आतंकवादी श्रीमंदिर उद्ध्वस्त करून टाकतील. मला कॉल करा, नाहीतर सर्वकाही उद्धवस्त होईल.” पुरीतील एका स्थानिक रहिवाशानं सांगितलं की, मंदिराच्या भिंतीवर अनेक फोन नंबर लिहिलेले आहेत. तसेच ‘पंतप्रधान मोदी’, ‘दिल्ली’ यांसारखे शब्दही लिहिलेले आहेत

पोलिसांनी तपास सुरू केला 

माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पुरीचे पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी सांगितलं की, “या प्रकरणाची आम्ही गांभीर्यानं दखल घेतली आहे. आम्हाला काही प्राथमिक माहिती मिळाली असून, अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथकं तयार करण्यात आली आहेत.”

एसपी मिश्रा पुढे म्हणाले की, “पोलीस मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, ही धमकी मंगळवारी रात्री लिहिली गेली असावी.” त्यांनी स्पष्ट केलं की, पोलीस या धमकीमागील हेतू आणि जबाबदार व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेनंतर परिसरात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची तैनातीही करण्यात आली आहे. संपूर्ण घटनेचा तपास सध्या सुरू असून, परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

जगन्नाथ मंदिराचे महत्त्व

१२व्या शतकात बांधलेलं पुरीचं जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील चार पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानलं जातं. ओडिशातील पुरी शहरात स्थित हे मंदिर भगवान विष्णूंच्या श्रीकृष्ण अवताराला समर्पित आहे. दरवर्षी जगभरातून लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात.